करोना नियंत्रणासाठी चाललेल्या प्रयत्नात येथील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने ‘अँटिव्हायरल फेव्हिपीरावीर’ गोळ्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. देशातील प्रमुख १० सरकारी, खासगी रुग्णालयातील रुग्णांची सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. चाचण्या आणि रुग्णांच्या पाहणीचे निष्कर्ष जुलै किंवा ऑगस्टपर्यंत अपेक्षित आहेत.

देशात या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची परवानगी प्रथमच ग्लेनमार्कला मिळाली. फेव्हिपीरावीर हे जपानमधील फुजिफिल्म टोयामा केमिकल्सने तयार केलेल्या ‘एव्हिगन’ या औषधाचे जेनेरिक द्रव्य आहे. फेव्हिपीरावीर इन्फ्ल्यूएंझा विषाणूच्या प्रतिकारासाठी परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. जपानमध्ये त्याला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापर करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ग्लेनमार्क हे औषध भारतात ‘फॅबि फ्ल्यू’ या नावाने आणत आहे. या औषधाच्या करोनाबाधित रुग्णांवर चाचण्या घेण्याची नियंत्रकांची परवानगी मिळाली आहे.

करोनाची सौम्य, मध्यम गंभीर बाधा झालेल्या १५० रुग्णांना निवडून फेव्हिपीरावीरचा इलाज केला जाईल. १४ दिवस हे इलाज चालतील. त्यांचे परिणाम २८ दिवसात उपलब्ध होतील. ग्लेनमार्कच्या उपाध्यक्ष डॉ. मोनिका टंडन  यांनी करोनाच्या रुग्णावर फेव्हिपीरावीरचा काय परिणाम होतो, याबद्दल कंपनीतील तसेच इतर शास्त्रज्ञही उत्सुक असल्याचे सांगितले. या विषाणूवर सध्या कोणताच प्रभावी इलाज उपलब्ध नसल्यामुळे या चाचण्या आणि रुग्णांची पाहणी याचे निष्कर्ष महत्त्वपूर्ण ठरतील असा आम्हांला विश्वास आहे. करोनाची समस्या कशी हाताळायची आणि उपचार कसे करायचे, याबद्दल स्पष्ट  मार्गदर्शन होण्यासाठी या चाचण्यांतून मिळालेल्या  माहितीचा उपयोग होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मध्य-पूर्व विभागाचे अध्यक्ष सुरेश वासुदेवन यांनी करोना रुग्णांसाठी लवकरात लवकर औषध उपलब्ध व्हावे आणि ही भयंकर साथ आटोक्यात यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्यास आमचे औषध देशभर सर्वत्र उपलब्ध व्हावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.