विश्रामगृहातील मुक्कामासाठी संभाजी काकडे यांच्या नावाचा वापर
कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहातील वास्तव्यासाठी ज्या माजी खासदारांच्या नावाचा वापर केला, त्या पुण्यातील संभाजीराव काकडे यांनी आपण तसे कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे विश्रामगृहातील कक्ष नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माजी खासदार काकडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासविणाऱ्या व्यक्तीने तसे कार्ड दर्शवत विश्रामगृहात कक्ष नोंदणी केली होती. परंतु, या नोंदणीसाठी आपण परवानगी दिली नसल्याचे काकडे यांनी सूचित केले. दुसरीकडे तृप्ती देसाई यांनी संबंधित स्वीय सहायक आणि काकडे यांचे घरगुती संबंध असून कक्ष नोंदणी करण्यासाठी तेव्हा न दिलेले पत्र आता दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ात भूमाता ब्रिगेडने कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलन केले होते. सलग दोन दिवस या आंदोलनावरून बराच गदारोळ उडाला. पुरोहित, गुरव मंडळींनी प्रखर विरोध केल्यामुळे देसाई यांना पोलीस संरक्षणात कसेबसे दर्शन घ्यावे लागले. यावेळी देसाई यांनी पोलिसांवर आगपाखड करून गाभाऱ्यात जाण्याचा हट्ट कायम ठेवला. याच काळात देसाई यांच्या वाहनावर दगडफेकही झाली. त्या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सलग दोन ते तीन दिवस चाललेल्या मंदिर प्रवेश आंदोलनावेळी देसाई यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहात कक्ष आरक्षित करण्यात आला होता. या कक्षाच्या नोंदणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुण्यातील माजी खासदार काकडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवत एका व्यक्तीने या कक्षाची नोंदणी केली होती. आपण स्वीय सहाय्यक असल्याचे कार्डही संबंधिताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्शविले. त्या अनुषंगाने विश्रामगृहात एक कक्ष उपलब्ध करण्यात आला. परंतु, या नोंदणीबाबत खुद्द संबंधित माजी. खासदार काकडे हे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कुटुंबियांनी विश्रामगृहात नोंदणीसाठी कोणतेही पत्र कोणालाच दिले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच काकडे यांनी कोणालाही स्वीय सहाय्यक नेमलेले नाही. त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी हा प्रकार केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. नाशिकच्या विश्रामगृहात कक्ष नोंदणी करावा, असे पत्र काकडे यांनी कोणालाही दिले नसल्याचे त्यांनी सूचित केले. या विषयी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माजी खासदार काकडे आणि गवारे नामक स्वीय सहाय्यक यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले. त्यावेळी अचानक नाशिकला आल्यामुळे कक्ष नोंदणीसाठी त्यांना माजी खासदारांचे पत्र देता आले नाही. हे पत्र त्यांच्याकडून आता पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित स्वीय सहायकाशी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. परंतु, उपरोक्त व्यक्तीशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही ते उपलब्ध झाले नाहीत. या एकंदर प्रकाराने शासकीय विश्रामगृहात कक्ष नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.