अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कुणीच वाली राहिलेला नाही. एकीकडे कार्यक्षम योग्य यंत्रणा कार्यरत नसल्याने नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे लांबत आहेत. साचेबद्ध कामकाजाच्या पद्धतीमुळे मिळणाऱ्या मदतीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. पंचनाम्याचे काम तातडीने करण्यासाठी उपग्रहाधारित छायाचित्र, ड्रोनचा वापर करण्याची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे विमा कंपन्याही कराराप्रमाणे वागत नाहीत, असा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय मंडळी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या कर्जाचा फेरा, विस्कटलेली शेतीची घडी यांचे गाऱ्हाणे समजून घेत ते सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासन देत आहेत. सरकार स्थापनेच्या विलंबामुळे तेथेही कोणी वाली राहिलेला नाही, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. शेतकऱ्यांना पडलेला कर्जाचा फेरा, परतीच्या पावसाने विस्कटलेली शेतीची घडी यातून बाजरी, मका, द्राक्ष, कांदा, सोयाबीन यांसह अन्य पिकांचेही वारेमाप नुकसान झाले. सध्या कृषी अधिकारी आणि पीक विमा कंपन्यांकडून संथ गतीने पंचनामे होत आहेत. पाच दिवस झाले तरी ३० टक्केही पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी, मंत्री नुकसान झालेल्या परिसरास भेट देत आहेत. हा ताफा अचानक शेताच्या बांधावर जातो. सरकारी अधिकारीही बरोबर असतात. त्यामुळे लगेच आपल्याला मदत मिळणार, या आशेने आपली गाऱ्हाणी बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधीसोबत मांडतात. शेतकऱ्यांच्या पाठीवर दिलासाचा हात ठेवत सडलेले पीक हातात घेत छायाचित्र काढले जाते. पण सरकार नाही, पंचनामे नाही, किती मदत मिळणार याची शाश्वती नाही.

आमचं संपूर्ण कुटुंब शेतावर आहे. आठ एकरमध्ये लावलेला मका, बाजरी, कांदा पीक हातचे गेले. वैरणही खराब झाली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार साकोरे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी केली. दीड एकर कांद्याचे पीक अवकाळी पावसात वाहून गेले. विहीर बुजली, माती वाहून गेली. यापुढे संसाराचा गाडा कसा रेटावा, असा प्रश्न धनेर येथील मच्छिंद्र वाघ यांनी केला.

सरकारने आपत्तीमध्ये विनाअट मदत करावी, सरसकट पंचनामे करावेत, तात्काळ भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नांदगाव तालुक्यात ३० टक्के पंचनामे झाले आहेत. बाधित ३७ हजार ५१३ पैकी बुधवारपर्यंत ११ हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी सांगितले.

ऑनलाइनच्या जमान्यात शेतीच्या नैसर्गिक आपत्तीचे मोजमाप पारंपरिक अर्थात मानवी फुटपट्टीने का केले जाते, हे काम उपग्रहाधारित छायाचित्राने होऊ शकते. पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनच्याही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा. – राम नेवले ( माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते शेतकरी संघटना.)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use drone satellite photographs akp
First published on: 07-11-2019 at 00:52 IST