काही वर्षांपूर्वी साहित्यिकांच्या लेखणीतून ‘भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ अशी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त होऊ लागली. या पाश्र्वभूमीवर, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिनाचे प्रयोजन करण्यात आले. या दिवसाला दिवसागणित महत्व प्राप्त होत असून शहर परिसरात सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने विविधांगी कार्यक्रमांचे नियोजन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आले आहे.
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी पहाटे साडे पाच वाजता ‘कुसुमाग्रज पहाट’ ही मैफल रंगणार आहे. गायक आणि उस्ताद रशिद खाँ यांचे शिष्य पं. कृष्णा बोंगाणे यांचे गायन तर पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य नॅश रॉबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे. संगीत साथ तबल्यावर नितीन वारे आणि निसर्ग देहूकर, संवादिनीवर दिव्या रानडे करणार आहेत. कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या पत्रकारिता व मराठी विभाग यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘कुसुमाग्रजांच्या नाटकातील स्वगते’ ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी सादर करतील.
शनिवारी ‘कुसुमाग्रजांच्या आठवणींना’ अभिनेते दीपक करंजीकर उजाळा देतील. संवाद या साहित्य, सांस्कृतिक संस्थेच्यावतीने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे छंदोमयी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज जन्मादिनानिमित्त हे संमेलन होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित कवींनी आपली एक स्वरचित कविता सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता कविवर्य कुसुमाग्रज उद्यान येथे महापौर अशोक मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राजकीय पक्षांकडून पक्ष कार्यालयात मराठी दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वि. वा. शिरवाडकर यांचे छायाचित्र शहर परिसरातील विद्यालयांमध्ये भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2016 रोजी प्रकाशित
मराठी भाषादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी पहाटे साडे पाच वाजता ‘कुसुमाग्रज पहाट’ ही मैफल रंगणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-02-2016 at 01:48 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various programs organized on marathi language day