वेग मर्यादेचे सर्वत्र उल्लंघन; परिसर संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

नाशिक : शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांकडून ६० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वेग मर्यादेचे उल्लंघन होत आहे. बहुतांश वाहने मर्यादेचे पालन न करता वेगात मार्गक्रमण करतात. दुचाकींप्रमाणे चारचाकी वाहने देखील वेगाशी स्पर्धा करीत आहेत. सकाळच्या वेळी वाहनधारकांना अतिघाई झाल्याचे लक्षात येते. या सर्व बाबी अपघातांना निमंत्रण देत असल्याचे परिसर संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

संस्थेने नाशिकसह पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतील एकूण ३४ रस्त्यांचा अभ्यास केला. यामध्ये नाशिक शहरातील आठ रस्त्यांचा समावेश आहे. स्वयंसेवकांनी नोव्हेंबर २०२० मध्ये या रस्त्यांवरील तब्बल नऊ हजार ३८६ वाहनांची वेग मर्यार्दा तपासली. त्यात बहुतांश वाहनधारकांकडून नियमांना तिलांजली दिल्याचे उघड झाले. वाहनधारकांकडून वेग मर्यादेच्या होणाऱ्या उल्लंघनाविरोधात पोलीस महासंचालकांनी प्रभावी रणनीती आखून कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. वाहनांचा वेग अपघाताचे कारण ठरतो. २०१९ मध्ये राज्यात वेगवान वाहनांमुळे ८१७५ जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी असे अनेक अपघात होत आहेत. नाशिक शहर त्यास अपवाद नाही. अशा अपघातात काहींना प्राण गमवावे लागले तर काहींना गंभीर दुखापती झाल्याची उदाहरणे आहेत.

संस्थेने जेलरोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रस्ता, तोफखाना रस्ता (औटेनगर) शरणपूर रस्ता, नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे रस्ता या रस्त्यांरील वाहनांच्या वेगाचे मापन केले. यात ५० टक्के दुचाकी, २९ टक्के चारचाकी, १० टक्के तीनचाकी आणि आठ टक्के अवजड वाहने होती. सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीनही वेळी वाहनांच्या वेगाचे मापन झाले. प्रत्येक रस्त्यासाठी जी वेग मर्यादा निश्चित केली आहे, तिचे काही अपवाद वगळता पालन होत नसल्याचे उघड झाले.

जेलरोडवर अधिकतम वाहने सरासरी ताशी ३३ किलोमीटरहून अधिक वेगाने धावत होती. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर बहुतांश वाहनांचा वेग ४६ ते ५० किलोमीटर दरम्यान होता. नाशिक-पुणे रस्त्यावर १३५८ वाहनांच्या वेगाचे मापन झाले. सर्वाधिक वाहने ताशी ४१ ते ४५ किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करताना आढळली. मुंबई-आग्रा रस्त्यावर ताशी ४६ ते ५० किलोमीटर, तोफखाना रस्त्यावर २६-३० किलोमीटर, गंगापूर रस्ता ३१ ते ३५ किलोमीटर, त्र्यंबक रस्ता ४१-४५ किलोमीटर, शरणपूर रस्त्यावर बहुतांश वाहनांचा वेग ताशी ३१ ते ३५ किलोमीटरच्या दरम्यान आढळला. गंगापूर रस्त्यावर रात्रीच्या तुलनेत सकाळ आणि दुपारी वाहने वेगाने चालविली जातात. सकाळी वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहनांचे प्रमाण ६४ टक्के तर रात्री ते ४८ टक्के असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

वाहनधारकांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन

गंगापूर रोड                  ६२ टक्के

शरणपूर रस्ता                ७२ टक्के

त्र्यंबक रस्ता                 ७१ टक्के

जेलरोड                      ६४ टक्के

तोफखाना रस्ता (औटेनगर)  ९५ टक्के

मुंबई-आग्रा महामार्ग   ८८ टक्के

नाशिक-पुणे रस्ता    ७५ टक्के (सकाळी)

नाशिक-औरंगाबाद रस्ता   ९४ टक्के

तोफखाना रस्त्यावर सर्वाधिक कमी वेग मर्यादा

राज्य शासनाच्या ऑक्टोबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोटारीसाठी ताशी ६० किलोमीटरपेक्षा जादा वेग नसावा. दुचाकीसाठी ताशी ५० किलोमीटर, तीनचाकी वाहनांसाठी ४० किलोमीटरची मर्यादा घालून दिलेली आहे. काही शहरात रस्तानिहाय वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केलेली आहे. नाशिक शहरात तसे फलक संबंधित रस्त्यांवर आहेत. जेलरोड, गंगापूर रस्ता, शरणपूर रस्ता, त्र्यंबक रस्ता, पालिका हद्दीतील नाशिक-औरंगाबाद रस्ता यावर ताशी ३० किलोमीटर, नाशिक-पुणे रस्ता, नाशिक-मुंबई महामार्ग ताशी ४० किलोमीटर तर तोफखाना रस्त्यावर ताशी २० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे.