भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विश्वास

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले होते आणि तरीही जास्त जागा मिळवून भाजप विजयी झाला होता. यावेळी शिवसेना-भाजप आणि अन्य पक्षांची महायुती झालेली आहे. लोकसभेत मिळालेला विजय आणि राज्य सरकारची    उल्लेखनीय कामगिरी यामुळे यावेळी २३३ जागा मिळवून महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपचे नेते

आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. नाशिक पश्चिममध्ये बंडखोरी झाली असली तरीही येथून भाजपच्या सीमा हिरेच विजयी होतील, असा दावाही सोमय्या यांनी केला.

भाजप पक्ष कार्यालयात सोमय्या यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.   राज्यात कोकण वगळता सर्व ठिकाणी महायुतीत चांगले वातावरण असून कोठेही एकमेकांविरोधात उमेदवार  उभे केलेले नाहीत. नाशिक पूर्वमधून भाजपचे बाळासाहेब सानप यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादीची वाट धरल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही. नाशिक पश्चिममध्ये शिवसेना विरोधात असली तरी भाजप उमेदवार एक लाखाचे मताधिक्य घेऊन जिंकून येईल, असा दावाही सोमय्या यांनी केला.  १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होती. त्यांनी काहीच काम केले नाही. उलट पाच वर्षे महाराष्ट्रात फडणवीस यांचे भाजप सरकार होते. त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असून राज्य विकासाच्या वाटेवर आहे. यामुळे १५ पेक्षा पाच मोठा ठरला. सत्तेत आल्यावर पुढील पाच वर्षांत काय करणार, याचा लेखाजोखा संकल्प पत्रात मांडण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

शिखर बँक घोटाळ्यात रोहित पवारही

लोकसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील संशयितांवर कारवाई होईल, असा दावा केला होता. मात्र तूर्तास महाराष्ट्र सदन संदर्भात उच्च न्यायालयात खटला सुरू असून लवकरच सिंचन घोटाळ्यावरही न्यायालयात काम सुरू होईल, असे सोमय्या यांनी नमूद केले. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार, रोहित पवार यांचाही समावेश आहे. त्यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलविण्यात येईल, असे सोमय्या यांनी सांगितले.

‘पीएमसी’ बँक घोटाळ्याची व्याप्ती मोठी

‘पीएमसी’ बँक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. बँक पुनर्जीवित करण्याचा आराखडा लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. आरबीआय, मुंबई पोलीस, बँकिंग मंत्रालय, मुख्यमंत्री यांच्याकडून निरीक्षक नेमला गेला आहे. महिनाभरात बँकेचा काय घोटाळा, पैसे कुठे अडकले, कुठे गेले याची माहिती समोर येईल. यामध्ये बँकेकडून दिली गेलेली विमाने राजकीय पक्षांनी वापरली आहेत. यात मोठय़ा प्रमाणावर घोटाळा झाला आहे. अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.