शहरातील सातपूर येथे राज्य कर्मचारी वसाहतीजवळील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याच्यामध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या हाणामारीत छातीला मार बसल्याने बेशुध्द झालेल्या विद्यार्थ्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोन विधीसंघर्षित बालकांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशराज तुकाराम गांगुर्डे (१६, रा. अशोकनगर, पवार संकुल,नाशिक) हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी सातपूर येथील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये जात होता. शनिवारी सायंकाळी क्लासमध्ये गेल्यावर त्याचा वर्गातील काही मुलांशी बाकडे सरकविण्यावरून वाद झाला. शिकवणी संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांशी वाद झाला होता, त्यातील काही मुलांनी यशला मारहाण केली. त्याला छातीला आणि पोटाला मार बसल्याने तो बेशुध्द झाला. हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे तसेच अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्लास परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यात आले. यशला मारहाण करणारे विद्यार्थी सीसीटीव्ही चित्रणात दिसल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. बसण्याच्या बाकड्यावरुन त्यांनी यशला मारहाण केल्याची कबुली दिली. सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन विधीसंघर्षित बालकांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशराज आणि इतर चार-पाच विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपासून क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद सुरू होता. हाच वाद शनिवारी मारामारीपर्यंत गेला. त्यातूनच यशराजला मारहाण होऊन मृत्यू झाला असावा, अशी परिसरात चर्चा आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून नाशिक शहरात पसरलेल्या गुन्हेगारीचे लोण आता विद्यार्थ्यांपर्यंत आले की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी दुपारी विधीसंघर्षित बालकांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ ुडाली असून विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थ्यांवरील ताण यासह अन्य मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
यशराजची आई रिक्षाचालक
यशराजच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचा करोना काळात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी यशराजच्या आईवर आली. कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी त्या रिक्षा चालवू लागल्या. यशराजचा मोठा भाऊ एमबीएचे शिक्षण घेत आहे.