महाजनादेश रथावर संधी मिळावी म्हणून नेत्यांची धडपड * ‘रोड शो’मध्ये २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी * फेरीतील दुचाकी अन् वाहनचालकांना संकेतांक
नाशिक : शहरात दाखल होणाऱ्या महाजनादेश यात्रेचे दिमाखात स्वागत करण्यासाठी बुधवारी दुपारी पाथर्डी फाटा ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान यादरम्यान काढण्यात येणाऱ्या मोटारसायकल फेरीत तब्बल चार हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत. या फेरीत इतर वाहनाने प्रवेश करू नये, म्हणून सहभागी दुचाकी आणि चालकांना सांकेतांक देण्यात आला आहे. ‘रोड शो’मधील रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख मंत्री उभे राहणार असून उर्वरित २५ हजार पदाधिकारी, कार्यकर्ते पायी सहभागी होणार आहेत.
या रथावर आरूढ होण्याची संधी मिळावी म्हणून स्थानिक नेत्यांची धडपड सुरू आहे. परंतु, दाखल होणाऱ्या मंत्र्यांची संख्या पाहता त्यांना कितपत संधी मिळेल, याविषयी संभ्रम आहे. या संपूर्ण नियोजनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
राज्यातील बहुतांश मतदारसंघातून मार्गस्थ झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप होत आहे. त्या अंतर्गत बुधवारी मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि मोटारसायकल फेरी तर गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. फेरी मार्गातील चौकांचे सुशोभिकरण, खड्डे बुजविण्याचे काम, झाडांच्या फांद्या काढणे आदी कामे आधीच केली गेली आहेत.
मंगळवारी दुपारी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांनी पाथर्डी फाटा ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या मोटारसायकल फेरी मार्गाची आणि नंतर त्र्यंबक नाका ते पंचवटी कारंजा या रोड शो मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भाजपचे झेंडे फडकत आहेत. वातावरण निर्मितीसाठी बुधवारी रांगोळ्याही काढल्या जाणार असल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.
मोटारसायकल फेरीसाठी ५०० स्वयंसेवक
मोटारसायकल फेरीसाठी स्थापन झालेल्या समितीने सूक्ष्म नियोजन केले असून आतापर्यंत चार हजार दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. फेरीत ५०० ते ६०० महिला दुचाकीवर सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रत्येक वाहनाचा क्रमांक, चालकाचे नांव, भ्रमणध्वनी आदीचा तपशील संकलित करण्यात आला आहे. संबंधित वाहनांसह चालकांना विशिष्ट सांकेतांक दिला गेला आहे. प्रत्येकी १०० वाहनांच्या ताफ्यामागे स्वयंसेवक कार्यरत राहणार आहे. दुसरे वाहन दिसल्यास त्यास फेरीतून बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, साडेसहा किलोमीटरच्या मार्गावरील फेरीत चालकांनी हेल्मेट परिधान करावे, ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी ‘हॉर्न’ वाजवू नये अशाही सूचना देण्यात आल्याची माहिती फेरीचे नियोजन करणाऱ्या समितीचे प्रमुख विक्रम नागरे यांनी दिली. पाथर्डी फाटा येथे महाजनादेश यात्रेचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी म्हणजे दीड ते दोन तास आधीच बहुतांश दुचाकी संभाजी स्टेडिअममध्ये आणल्या जातील. या फेरीत युवकांसह मध्यम वयोगटातील व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. ज्येष्ठांना मोटारसायकल फेरीपासून दूर ठेवण्यात आले आहे. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी चालकांना हॉर्न वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे नागरे यांनी सांगितले.
रथावर शिष्टाचारानुसार प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये किमान २५ हजार पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मार्गाचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री रथातून मार्गक्रमण करतील. उर्वरित कार्यकर्ते पायी असतील. रथात शिष्टाचारानुसार पदाधिकाऱ्यांना आरूढ होता येईल, असे भाजपचे महानगरप्रमुख गिरीश पालवे यांनी सांगितले. पाथर्डी फाटा येथे पारंपरिक लेझीम, ढोल पथकाने यात्रेचे स्वागत केले जाईल. फेरी मार्गावर रांगोळ्या, पताका, झेंडे आदींनी सुशोभिकरण प्रगतीपथावर आहे.
पावसाच्या अंदाजामुळे भाजपच्या गोटात चिंता
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तीन टप्प्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होत आहे. यानिमित्त बुधवारी शहरात मोटारसायकल फेरी आणि ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे. हवामानशास्त्र विभागाने बुधवारी नाशिकसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यामुळे मोटारसायकल फेरी आणि ‘रोड शो’वर पावसाचे सावट राहते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे.
हवामानशास्त्र विभागाने बुधवारी इतर काही जिल्ह्य़ासह नाशिकमधील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे जिल्ह्य़ातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि मोटारसायकल फेरी तसेच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहे. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जय्यत तयारी केली आहे. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून सर्व तयारी पूर्णत्वास नेली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये प्रथमच त्यांचा रोड शो होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी तो यशस्वी करण्याचा चंग पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.
त्यादृष्टीने विविध पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यानंतर पाथर्डी फाटा, अंबड लिंक रस्ता, सिडकोमार्गे त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अशी मोटारसायकल फेरी काढली जाईल. नंतर त्र्यंबक नाका ते गंजमाळ, मेनरोड, रविवार कारंजामार्गे पंचवटी या मार्गावर रथातून
मुख्यमंत्र्यांचा रोड शो होईल. या मार्गांची स्वच्छता, सुशोभीकरणाचे काम करण्यात आले.