धुळे – मिळकतीवर वित्तीय कंपनीचे कर्ज आणि जीएसटी विभागाचा बोजा असताना खोटी खरेदी पावती लिहून देत दाम्पत्याने एका व्यापाऱ्याला ४० लाख रुपयांना गंडवले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील देवपूर भागातील नंदनवन बँक कॉलनीत वास्तव्यास असलेले व्यापारी मनोज नाशिककर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०११ ते २०१८ या कालावधीत दिनेश शहा-मंत्री आणि त्यांची पत्नी चंचलाबेन यांनी त्यांच्या मालकीची देवपूरमधील पौर्णिमा नगरातील मिळकत नाशिककर यांना विकण्यासाठी खोटी खरेदी पावती लिहून दिली. या व्यवहारात नाशिककर यांच्याकडून वेळोवेळी ४० लाख रुपये घेतले. हा व्यवहार नाशिककर आणि शहा यांच्या राहते घरी वेळोवेळी धनादेशाद्वारे झाला आहे. परंतु, ज्या मिळकतीचा खरेदी विक्रीचा व्यवहार नक्की करण्यात आला, त्या मिळकतीवर वित्तीय कंपनीचे कर्ज आणि जीएसटी विभागाचा बोजा असल्याची माहिती नाशिककर यांना मिळाली. ही माहिती शहा दाम्पत्याने लपवून ठेवल्याचे उघड झाले. फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच नाशिककर यांनी पोलिसात धाव घेतली. शहा दाम्पत्य फरार आहे.