जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथे आठ वर्षीय मुलीच्या पायाला सात महिन्यांपूर्वी अचानक बंदुकीची गोळी लागली होती. त्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या पालकांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथे तिच्या पायावर टाके घालून प्राथमिक उपचार तेवढे करण्यात आले. आता पुन्हा मुलीला तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पायात अद्याप गोळी अडकून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
मोहाडी गावात आठ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत अंगणात खेळत असताना अचानक तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने मोहाडीतील नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयात नेले. मात्र, रक्तस्त्राव वाढत असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला.
प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात तिच्या जखमेवर फक्त टाके घालून मलमपट्टी करण्यात आली. आणि उपचार पूर्ण झाल्याचे सांगत तिला घरी सोडण्यात आले. परंतु, सात महिने उलटताच तिच्या पायात पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्या. बोटे काळी पडू लागल्याने पालकांनी तिला जळगाव शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. मुलीच्या पायात अद्याप बंदुकीची गोळी अडकून असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने सर्वांना धक्का बसला.
खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी मुलीच्या पायात गोळी आढळल्याचे लक्षात घेताच तातडीने उपचार सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी या गंभीर प्रकाराची माहिती पालकांना देऊन त्यांना थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पाठवले. घटनेनंतर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पालकांची सखोल चौकशी केली. मात्र, मुलीच्या पायात गोळी कशी लागली, याबाबत पालकांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
अगदी मुलीला सुद्धा त्या दिवशी पायाला नेमके काय लागले होते, हे स्पष्ट सांगता आले नाही. यामुळे पोलिसांसमोरील गोंधळ अधिकच वाढला आहे. दरम्यान, ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेली असल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा मुलीच्या पालकांना पुढील चौकशीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.
पालकासंह मुलीला पायाला गोळी कशी लागली किंवा ती कोणी झाडली, याविषयी काहीच माहिती नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. सखोल चौकशीतून खरा काय तो प्रकार समोर येईल. त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; परंतु, त्या ठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याबद्दल पोलिसांना कळविले नाही की पालकांकडून व्यवस्थित माहिती जाणून घेतली नाही. तसेच तात्पुरती मलमपट्टी करून मुलीला घरी पाठवून दिले. त्यामुळे मुलीला गोळी लागल्याच्या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी देखील तितकेच दोषी असल्याचे दिसून आले आहे. त्याविषयी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.