नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर करोनाबाधितांचं हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस इथं रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मालेगाव शहरात करोनाचे ८२ नवीन रूग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे करोनाबाधित रुग्णांमध्ये कर्तव्यावर असलेल्या बऱ्याच पोलिसांचाही समावेश आहे.

गेल्या चोवीस तासातील नव्याने वाढलेल्या या ८२ रुग्णांमुळे मालेगामध्ये आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या ही २५३ वर पोहोचली आहे. तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २७६ वर पोहोचली आहे. तर करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १२ जणांना जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, मालेगावकरांसाठी रविवारचा दिवस दिलासा देणारा ठरला होता. कारण, येथे उपचार घेत असलेले तीन करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने आणि त्यांचे दोन तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने मन्सुरा कॉलेज हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यावेळी फुलांची उधळण करत या तिघा रुग्णांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.