जळगाव जिल्ह्य़ातील पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे घनिष्ट संबंध असल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सादरे कुटुंबीयांना गरज भासल्यास आपतर्फे वकीलही उपलब्ध केला जाईल, असे पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांनी सांगितले. शुक्रवारी मेनन यांनी येथे सादरे कुटुंबीयांची भेट घेतली. संशयित वाळू तस्कराशी संबंध असलेल्या खडसे यांनी राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जळगाव जिल्ह्य़ात कार्यरत असणारे आणि अलीकडेच निलंबित झालेले पोलीस निरीक्षक अशोक गोरक्षनाथ सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभाकर रायते व वाळू तस्कर सागर चौधरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी सादरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते यांच्या छळास कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे म्हटले होते. पैशांसाठी व दिवाळीत सोने दिले नाही म्हणून संबंधितांनी छळ केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. संशयित वाळूमाफिया चौधरीशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असल्याचा आरोप आपसह राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्याचा पुनरुच्चार मेनन यांनी केला. सादरे कुटुंबीयांची पंचवटीतील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. गुन्हा दाखल करूनही पोलीस संशयितांना अटक करणे टाळत आहे. राजकीय दबावामुळे हे घडत असल्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मेनन यांनी जळगावमधील वाळू तस्कर चौधरी आणि खडसे यांचे निकटचे संबंध दाखविणारे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आणून दिले. जळगावमध्ये वाळूमाफियांचे राज्य असल्याची स्थिती आहे. जळगावचे पालकमंत्री संबंधितांना पाठिशी घालतात. त्यामुळे खडसे यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी सांगितले. सादरे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. सादरे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास आप पक्ष वकील उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी नमूद केले.