नाशिक येथील सातपूर परिसरात आयसीआयसीआय बँकेच्या केंद्रातील एटीएम टायरच्या साहाय्याने जमिनीतून उखडून बोलेरोमधून घेऊन पसार होण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न गस्तीवरील बीट मार्शलच्या धाडसामुळे उधळला गेला होता. थरारक पाठलाग करून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. हे संशयित धुळ्यातील मोहाडी परिसरातील आहेत. मोहाडी पोलिसांनी संशयित मिलनसिंग भादा याच्या घराची झडती घेतली. तेव्हा शस्त्रासह उदमांजर, रानडुकराचे मुंडके आणि वन्यजीवांचे दात सापडले. हा मुद्देमाल जप्त करत या प्रकरणी मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील खोडे पार्क परिसरात आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. रोख रकमेची पेटी दरोडेखोरांनी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असताना बीट मार्शल तिथे पोहोचले. त्यांच्या मोटारसायकलला बोलेराची धडक देत संशयितानी पलायन केले. बीट मार्शलने या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे सर्व गस्ती वाहनांना दिली . त्यानंतर एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक पाठलाग करून पोलिसांनी पंचवटीतील हिरावाडी परिसरात दोघांना पकडले होते. मिलनसिंग रामसिंग भादा आणि गजानन मोतीराम कोळी (मोहाडी, धुळे) अशी या संशयितांची नावे आहेत. मिलनसिंग भादा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर धुळ्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. मोहाडी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी भादा याच्या मोहाडी उपनगरातील घराची झडती घेतली. या झडतीत भाले, तलवारी, कटय़ार, चांदीच्या दागिन्यांसह रानडुकराचे मुंडके, वन्यजीवांचे दात, जिवंत उदमांजर आढळून आले. वन्यजीवांचे अवयव सापडल्याने पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविले. वन अधिकाऱ्यांनी तपासणी करून वन्यजीवांचे दात, रानडुकराचे मुंडके, अवयव, उदमांजर ताब्यात घेतले. तर मोहाडी पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused weapons palm civet akp
First published on: 27-09-2019 at 02:10 IST