2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted : मालेगाव : संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मालेगाव शहरात २००६ व २००८ अशा दोन वेळा दोन वेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. २००६ च्या खटल्यातील सर्व नऊ आरोपींची या आधीच पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. आता २००८ च्या बॉम्बस्फोट खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्यासह अन्य सहा जणांची देखील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील संशयितांना निर्दोषत्व बहाल करण्याची पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन २००६ मध्ये शब्ब-ए-बारात या मुस्लिम धर्मीयांच्या सणाच्या दिवशी शहरातील बडा कब्रस्तानात साखळी बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या बॉम्बस्फोटात ३१ जण ठार झाले होते. तसेच ३०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. यात शहरातील नुरुल हूदा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फारशी, फरोग मुगदमी, शेख मोहम्मद अली, आसिफ खान, मोहम्मद जाहीर, अब्रार अहमद या नऊ संशयितांना अटक करण्यात आली होती. हे सर्वजण सिमी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान यातील शब्बीर अहमद या संस्थेचा मृत्यू झाला होता. नंतर २०१६ मध्ये दिलेल्या निकालात विशेष न्यायालयाने या सर्वांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती.

२९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोटाची दुसरी घटना मालेगावात घडली होती. या दिवशी रमजान ईद सणाच्या पूर्वसंध्येला महिला-पुरुषांची खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू असताना रात्री भिकू चौक भागात बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. यात सात जणांचा बळी गेला होता. तसेच शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. या ठिकाणी ज्या दुचाकीवर स्फोटकांचा साठा ठेवण्यात आलेला होता, ती दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार साध्वी, कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल १७ वर्षांनी या खटल्याचा गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यात पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

या निकालामुळे बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या व्यक्तींचे नातेवाईक तसेच संशयितांना शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या मुस्लिम धर्मीय संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. या निकाला विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करावे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे. हिंदू समाज कधी दहशतवादी कृत्य करू शकत नाही, हे न्यायालयात सिद्ध झाले आहे, अशी भावना या मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

मालेगावात हेमंत करकरे मार्ग…

२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. त्यापूर्वीच्या दहशतवादी कारवायांमध्ये शक्यतो मुस्लिम समुदायातील संशयित आढळून येत असल्याची प्रचिती येत होती. मात्र या प्रकरणाच्या तपासात संशयित म्हणून हिंदू लोकांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे तेव्हा देशात प्रथमच ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग प्रचलित झाला. पुढे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात करकरे हे शहीद झाले. त्यानंतर त्याना आदरांजली म्हणून मालेगाव येथे ज्या भिकू चौकात हा बॉम्बस्फोट झाला होता, त्या ठिकाणच्या मार्गाचे शहीद हेमंत करकरे मार्ग असे नामकरण करण्याचा ठराव मालेगाव महापालिकेत करण्यात आला. त्यानुसार या फलकाचे अनावरण करण्यात आले.

मालेगावकरांमध्ये उत्सुकता…

दंगलीचे शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावात २००१ नंतर दंगल घडल्याचे एकही उदाहरण नाही. तसेच शहरात शांतता व सौहार्दाचे नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र २००६ व २००८ अशा दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटनांमुळे त्याला गालबोट लागला. २००६ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यामुळे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या १७ वनंतर लागणाऱ्या निकालाकडे शहरवासीयांमध्ये मोठी उत्कंठा निर्माण झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगावात कडक बंदोबस्त…

या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू व त्यांचे सहकारी प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, या भिकू चौक भागात पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या व शीघ्र कृती दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील विशिष्ट भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसत आहे.