पोलीस आयुक्तांची राज ठाकरे यांच्याशी चर्चा

नाशिक : मनसेचे फलक हटविल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. विनापरवानगी लावलेल्या फलकांविरुद्ध दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरुच राहिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताचे फलक बुधवारी महापालिकेच्या वतीने हटविण्यात आले. यावेळी महापालिकेचे कर्मचारी, पोलीस यांच्याशी मनसे कार्यकर्त्यांनी वाद घालत्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून झाला.

या तणावाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी गुरुवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांच्याशी अत्यंत चांगला संवाद झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात विनापरवाना फलकबाजी चालू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज यांनी फलकबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने त्यास सुरुवातीपासून आपला विरोध असल्याचे सांगितले. इतर पक्षांचे फलक लागत असताना मनसेचे का नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारला जातो. त्यामुळे फलक लावणे न लावणे हा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपविला असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, शहर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले  स्वागत फलक काढण्याची कारवाई गुरुवारीही सुरू राहिली. संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

कारवाई सुरूच राहणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चेत पोलिसांच्या नियमांचे तसेच आदेशांचे पालन करणे गरजेचे असल्याचे ठाकरे यांनी मान्य केले. पक्ष कुठलाही असो, पोलिसांच्या परवानगीशिवाय फलक लावता येणार नाही. जे असे फलक लावतील, त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शहरात जे फलक लागले आहेत, त्यांना पोलीस आयुक्तांचा आदेश माहिती असूनही फलक का लावलेत, अशी विचारणा करत कारवाई करण्यात येईल.

दीपक पाण्डेय  (पोलीस आयुक्त)