पोलिसांच्या दुटप्पीपणाबद्दल संताप; मालमत्ताधारकांवरील कारवाईविषयी प्रश्नचिन्ह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट प्रवेश दिल्यास संबंधित संस्थेच्या मालमत्ता अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, काही पोलीस ठाण्यांसह अन्य शासकीय कार्यालयांत हेल्मेटविना दुचाकीस्वार ये-जा करतात. अशा ठिकाणी कारवाईला बगल दिली जाते. रस्त्यांवरून हेल्मेटविना दुचाकीस्वार बिनदिक्कत मार्गक्रमण करतात. त्यांच्यावर अपवादाने कारवाई होते. परंतु, संबंधितांनी एखाद्या संस्थेच्या आवारात प्रवेश केल्यास मालमत्ता अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याच्या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहर पोलिसांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. त्याअंतर्गत हेल्मेटशिवाय वाहनात इंधन देण्यास बंदी घालण्यात आली. त्याचा फारसा प्रभाव दिसत नसल्याने मग शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी हेल्मेटविना येणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रवेशास प्रतिबंध करण्याचे फर्मान निघाले. कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेश दिल्यास संबंधित मालमत्ता धारकास  जबाबदार धरण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानुसार आठवडाभरापासून कारवाई केली जात आहे. अलीकडेच वाहतूक शाखेच्या भरारी पथकांनी पंचवटीतील दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी आणि कॉलेज रोडवरील हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या प्राचार्यावर कारवाई केली. हं.प्रा.ठा. महाविद्यालय ज्या परिसरात आहे, तिथे एकूण चार ते पाच महाविद्यालये आहेत. त्या सर्वाचे प्रवेशद्वार आणि वाहनतळ एकच आहे. अशा परिस्थितीत हेल्मेटविना प्रवेश करणारा वाहनधारक नेमका कुठे आला होता, याचा बोध होणे शक्य नाही. अशा स्थितीत एका महाविद्यालयाच्या प्राचार्याना जबाबदार धरले गेले.

कॉलेज रोडवर दिवसरात्र विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची कसरत सुरू असते. शहरातील इतर रस्ते त्यास अपवाद नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रस्त्यांवर कारवाई केली जात नाही. पण हे दुचाकीस्वार एखाद्या संस्थेच्या आवारात गेल्यास त्यांच्याऐवजी मालमत्ता अधिकारी, प्राचार्याना जबाबदार धरण्याची कृती योग्य नसल्याची भावना शैक्षणिक वर्तुळात उमटत आहे. पोलीस आयुक्तालय आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेश दिला जात नाही. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालय, अनेक पोलीस ठाणे, शासकीय कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे पालन होत नाही. तिथे विनाहेल्मेट वाहनधारक ये-जा करतात. म्हणजे कारवाईत दुजाभाव केला जात असल्याकडे लक्ष वेधले जात आहे. सिग्नल किंवा रस्त्यांवर धडक कारवाई केल्यास हेल्मेटविना भ्रमंतीला पायबंद बसेल. तशी कारवाई न करता शाळा, महाविद्यालयांचे मालमत्ता अधिकारी, प्राचार्याना जबाबदार धरण्याची कृती आश्चर्यकारक असल्याचा सूर उमटत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action helmet police action ysh
First published on: 12-01-2022 at 02:23 IST