जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा इशारा

नाशिक : ज्या रुग्णालयाने तपासणी दरम्यान रेमडेसिविरचा वापर त्या रुग्णालयातील रुग्णांसाठी न करता ते बाहेरच्या रुग्णांना दिल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयास नोटीस देऊन खुलासा मागवावा. तसेच खुलासा न दिल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत या इंजेक्शनचा अनावश्यक वापर होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्य़ात रेमडेसिविर इंजेक्शन आणि प्राणवायूचा तुटवडा भासत आहे. रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरची गरज असल्याचे सांगण्यात येत असल्याने ते हवालदील होत आहेत. करोनाच्या या पार्श्वभूमीवर, निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना भेट देऊन तेथील स्थितीचा जिल्हाधिकारी मांढरे यांनी आढावा घेतला. रेमडेसिविर हे पात्र, गरजू रुग्णांना दिले जात असल्याची खातरजमा करावी. त्याच्या वापराचे सर्व लेखे रुग्णालयात जतन केले जात असल्याची खात्री करावी, असेही त्यांनी सूचित केले. आतापर्यंत दैनंदिन प्राप्त रेमडेसिविरच्या वापराबाबत प्रत्येक रुग्णालयाकडून विहित केलेल्या नमुन्यात माहिती मागवावी. तसेच सर्व काळजी केंद्रातील प्राणवायू वापराबाबतचे परीक्षण करून त्याचा वापर प्रमाणित मापदंडाइतका असल्याची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली.

तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वस्तिक प्रकल्पास भेट देण्यात आली. या प्रकल्पातून प्राप्त होणाऱ्या ६०० प्राणवायू सिलिंडरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्राणवायूअभावी बंद असलेले करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील सर्व डॉक्टरांची ऑनलाईन बैठक घेऊन रूग्णालयांनी रेमडेसिविर आणिा प्राणवायू वापराबाबतचा अहवाल नियमीत सादर करावा, अशी सूचना मांढरे यांनी केली. बैठकीस करोना कक्षाचे अधिकारी डॉ. चेतन काळे, सिन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, निफाड नगरपंचायतच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची  प्राणवायू प्रकल्पांना भेट

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील दोन प्राणवायू प्रकल्पांना भेट दिली. त्यातील एका प्रकल्पातून १३ मेट्रिक  टन प्राणवायू निर्मिती केली जात आहे. त्या माध्यमातून माळेगाव आणि ग्रामीण भागास प्राणवायूचा पुरवठा करण्यात येतो.