नंदुरबार – नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याबरोबर युती नकोच. त्यापेक्षा स्वबळावर लढणे गरजेचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी तंबी दिली असतानाही अजित पवार आणि शिंदे गटाने भाजपविरोधात काम केले. त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न भाजपचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी उपस्थित केला आहे. महायुतीतील बेबनाव नंदुरबारमध्ये चव्हाट्यावर आला आहे.

राज्यातील सत्तास्थानी असलेल्या महायुतीत नंदुरबारमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार, शिंदे गट यांचे सूर जुळतांना दिसत नाही. स्थानिक नेत्यांमधील वाद, त्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा, यातच नंदुरबारमध्ये महायुतीमधील घटक पक्ष नेहमीच वादात राहण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच नगरपालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याबाबत तीनही पक्षांचे प्रमुख नेते निर्धार व्यक्त करत असताना नंदुरबारमध्ये उघड सभांमधून स्बळाचा नारा दिला जात आहे. जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यातील महायुतीमधील तीनही पक्ष सध्या तालुकानिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेत असून त्यात पक्ष ताकदीची चाचपणी करत आहेत.

अशातच भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी, अजित पवार गट आणि शिंदे गटाविरोधातील भूमिका स्पष्टपणे मांडली. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र चूल माडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाने थेट विरोधाची भूमिका घेत भाजपविरोधात काम केले. वरिष्ठांनी कानउघाडणी करुनही या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विरोधात काम केल्याने त्यांच्यावर  विश्वास कसा ठेवायचा आणि पुढील निवडणूका खेळीमेळीच्या वातावरणात कशा होणार, असा प्रश्न डाॅ. गावित यांनी केला आहे.

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर डाॅ. विजयकुमार गावित यांचा रोष असला तरी अजित पवार गटासंदर्भातही त्यांनी सुचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे दुसरे आमदार राजेश पाडवी यांनी मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशान्वये महायुती म्हणूनच आगामी निवडणुका लढविण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांवरुन भाजप आमदारांमध्येच मतभेद पहायला मिळत आहे.  नंदुरबार तालुक्यात शिंदे गटाने जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवारांची चाचपणी केली असल्याने त्यांची भूमिकादेखील एकला चलो ची असल्याचा कयास बांधला जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये फाटाफुट होण्यास नंदुरबारमधील राजकारण निमित्त ठरणार असल्याची चर्चा आहे.