नाशिक – वार गुरूवार. वेळ सकाळी सात सव्वासातची. देवळाली रेल्वे स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे आगमन होताच रेल्वेमध्ये चढताना आई- मुलांची ताटातूट झाली. डब्यात चढताना महिलेचा हात सुटल्याने सर्वांचा थरकाप उडाला. त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला. आई आणि मुलीचा जीव वाचला.

सकाळी सात वाजून २० मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेस देवळाली रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यावेळी मुंबईला जाण्यासाठी प्रिया बच्छाव आणि त्यांची मुलगी निकिता (नऊ) आणि मुलगा (आठ) हे आले. प्रिया यांनी बोगी एम-१, एम-२ कुठे आहे, अशी विचारणा प्रधान आरक्षक आनंद वाघ यांना केली. तोपर्यंत गाडीने सिग्नल दिला. वाघ यांनी प्रिया यांना तुम्ही कुठल्याही बोगीत बसा, पुढील स्थानकात तुमच्या बोगीत चढा, असे सांगितले. त्यांनी प्रिया यांच्याबरोबर असलेली त्यांची मुलगी निकिता आणि मुलाला बोगीत चढवले. काही सामान प्रिया यांनी चढवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे सुरू झाल्याने प्रिया यांचा धावपळीत दरवाज्याला धरलेला हात सुटला. त्या रेल्वे आणि फलाट यांच्या जागेत पडल्या. हा प्रकार वाघ यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने संपूर्ण ताकदीने प्रिया यांना बाहेर काढले. हा सर्व प्रकार त्यांची मुलगी निकिता हिने पाहिला. आई पडली असा ओरडा करुन तिने धावत्या रेल्वेतून उडी घेतली. स्थानकावर असलेल्या कर्मचारी सविता भोईर यांनी निकिता हिला जोरात खेचल्याने तिचा जीव वाचला. यादरम्यान, रेल्वेमधील प्रवाशांनी साखळी ओढल्याने रेल्वे थांबली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रिया आणि त्यांच्या मुलीला आश्वस्त करत रेल्वे बोगीत बसवले. त्यानंतर रेल्वे पुन्हा सुरु झाली. हा सर्व प्रसंग उपस्थितांच्या हृदयाचा थरकाप उडविणारा होता. वाघ यांच्या तत्परतेचे रेल्वे प्रवाशांनी कौतुक करुन त्यांच्याबरोबर छायाचित्रही काढले.