नाशिक : सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असताना आणि सर्व धरणे ओसंडून वाहत असतानाही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न त्वरित सोडवावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढत प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढले. मागील दोन दशकात शहरात कधी पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली नव्हती. महापालिकेत प्रशासक नियुक्त झाले, तेव्हापासून हा प्रश्न भेडसावत असल्याची तक्रार केली गेली. पाण्यासह अन्य प्रश्न आठ दिवसांत न सोडविल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी त्र्यंबक रस्त्यावरील मुख्य जल वाहिनीतील गळतीमुळे सातपूर व पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अनेक दिवसांनंतर तो कसाबसा पूर्ववत केला गेला. याच काळात प्रशासनाने तब्बल २०० कोटींची नवी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव आणला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पाणी टंचाई, प्रशासकीय राजवटीतील प्रस्ताव यावरून राजकीय पक्ष व नेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. शिवाजीनगर, श्रमिकनगर, गंगापूर, ध्रुवनगर, अशोकनगर, धर्माजी कॉलनी आदी भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या भागातून जलशुध्दीकरण प्रकल्प जवळच आहे. गंगापूर धरणही फारसे दूर नाही. तरीदेखील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे दिनकर पाटील यांनी म्हटले आहे. मनपा अधिकारी कुठल्याही प्रकारचे नियोजन करीत नाही. पाणी पुरवठा विभागात सावळागोंधळ सुरू आहे. अधिकारी नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी महिला हंडा मोर्चाद्वारे महापालिकेवर धडकल्या.

 शहरात केवळ पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीही भयानक स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रस्त्याची कामेही निष्कृष्ट दर्जाची असून ती संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. गंगापूर धरण परिसरात विजेचा प्रश्न नेहमी भेडसावतो. तिथे सौर ऊर्जेची व्यवस्था पर्याय म्हणून वापरावा, अशी मागणी दिनकर पाटील, अमोल पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे प्रश्न लवकर न सोडविल्यास जन आंदोलन उभारले जाईल. असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी भाजप सरचिटणीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह महिला महिला संख्येने उपस्थित होत्या.

श्रेय घेण्यावरून नेत्यांमध्ये संघर्ष

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पाणी पुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचे श्रेय घेण्यावरून नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर दिनकर पाटील यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी टाकलेल्या सिमेंटच्या वाहिन्यांचे आयुष्य २०४० पर्यंत आहे. तरीही मनपा प्रशासनाने २०० कोटी रुपयांचा वाहिनीचा प्रस्ताव आणला. जुन्या वाहिन्यांचा तज्ज्ञांकडून अभ्यास न करताच प्रशासकीय राजवटीत एवढय़ा मोठय़ा प्रकल्पाची घाई कशासाठी, असा प्रश्न केला होता.