तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सोमवारी वैद्यकीय क्षेत्राने धन्वंतरीचे तर शेतकरी व सर्वसामान्यांनी धन-धान्याची पूजा करत धनत्रयोदशी उत्साहात साजरी केली. वाढत्या महागाईची पर्वा न करता आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या माध्यमातून दीपोत्सवाचे स्वागत करण्यात सर्व मग्न आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये असणारी गर्दी लक्ष्मीपूजन व भाऊबीजच्या पाश्र्वभूमीवर ओसंडून वाहत आहे.
प्रकाशाचा हा उत्सव यंदा सहा दिवसांचा आहे. शनिवारी गाय-वासरु पूजन अर्थात वसुबारसने त्याची सुरुवात झाल्यानंतर सोमवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली. आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरीचे पूजन करतात. आरोग्यरूपी धन सर्वाना प्राप्त व्हावे हाही या पूजनाचा उद्देश आहे. या निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुशीला आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते धन्वंतरीचे विधिवत पूजन करण्यात आले. यासाठी केंद्राने चांदीची मूर्ती जयपूर येथुन तयार केली. या दिवशी विधिवत चल प्रतिष्ठा करण्यात आली. राज्यातील ही धन्वंतरीची पहिली मूर्ती असल्याचे वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. शहरात धन्वंतरीचे मंदिर व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. घरोघरी या दिवशी धन-धान्याची पूजा करण्यात आली. शहरी भागात उत्साह असला तरी ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट आहे.
लक्ष्मीपूजन व भाऊबीजसाठी अजून दोन ते तीन दिवस अवधी असतांना बाजारपेठांमधील खरेदीचा माहौल कायम आहे. धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजन व भाऊबीजच्या स्वागतासाठी व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. खतावण्या, चोपडय़ा यांना व्यापारी लक्ष्मी म्हणून पूजत असल्याने लक्ष्मीपूजनाचे महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण. तर घराघरांमध्ये केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाते. केरसुणी, पणत्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. खरेदीसाठी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त चांगला मानला जात असल्याने सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, वाहन दुकानांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात आगावू नोंदणी करून ठेवली आहे. शहरी भागात हे चित्र असले तरी ग्रामीण भागात मात्र दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी शेतीतून फारसे उत्पन्न हाती पडण्याची शक्यता नसल्याने शेतकरी वर्गाची दिवाळी काहीशा अनुत्साहात साजरी होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे.