अत्याधुनिक साधनसामग्रीने तोफखाना विभाग सज्ज

पदवी प्रदान सोहळ्यात कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया यांचे मार्गदर्शन

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात पदवी प्रदान करताना स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया

पदवी प्रदान सोहळ्यात कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया यांचे मार्गदर्शन

नाशिक : भारतीय तोफखाना विभागाने स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या कारगिल, सियाचेन यांसारख्या वेगवेगळ्या युद्धांत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. तोफखाना म्हणजे शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेला भेदणे इथपर्यंत मर्यादित नसून अत्याधुनिक साधनसामग्रीने तोफखाना सज्ज आहे, असे स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया यांनी सांगितले.

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरच्या तोफखाना विभागाच्या वतीने आयोजित पदवी प्रदान समारंभात सलारिया यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आर्टिलरी सेंटरचे कमाडंर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमात ११ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ५०७ प्रशिक्षणार्थीची तुकडी पदवी प्रदान समारंभानंतर देशसेवेसाठी सज्ज झाली. या वेळी सलारिया यांनी तोफखान्याचे ‘सर्वत्र इज्जत इकबाल’ हे ब्रीद जपण्यासाठी काम करणे प्रत्येक सैनिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. सामान्य नागरिक आणि सैनिक यांच्यातील फरक म्हणजे शिस्तीचे पालन. सैनिक असल्याने शिस्तीचे पालन गरजेचे असून सैन्य दलाची प्रतिमा मलिन होईल, अशी कुठलीही कृती आपल्या हातून घडू नये. प्रसंगी प्राणाची पर्वा न करता देश हितासाठी लढणे, समर्पण वृत्ती हे सैनिकाचे कर्तव्य आहे.

वेगवेगळ्या युद्धात तोफखाना रेजिमेंटने जे योगदान दिले ते सर्वश्रुत असून वेळोवेळी विभागाने आपले कौशल्य सिद्ध केले आहे. तोफखाना सर्व आयुधांनी सज्ज असून अद्ययावत क्षमता असलेली साधनसामग्री आपल्या विभागाकडे आहे. शपथग्रहणानंतर प्रक्षिणार्थीना काम करण्याची संधी मिळणार आहे. जास्तीजास्त संधी मिळेल, तेव्हा प्रत्येक काम मनापासून करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तोफखाना विभागाच्या वतीने या वेळी प्रशिक्षणार्थीना सैनिक होण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. प्रशिक्षणार्थीनी वेगवेगळ्या कसरती करत आपले कौशल्य सिद्ध केले. प्रशिक्षण काळात विविध स्पर्धा तसेच परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थीचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तोफखाना विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि पालकांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यातील संचलनाने सर्वाचे लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Artillery department ready with ultra modern material

ताज्या बातम्या