जळगाव – जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस जेमतेम सावरली होती. त्यानंतर आता रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांनीही भाजपमध्ये समर्थकांसह प्रवेश करून राष्ट्रवादीला आणखी दुसरा धक्का दिला. दरम्यान, पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण स्पष्ट करून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांनी राजकारणात भाजपच्या माध्यमातून पदार्पण केले होते. भाजपमध्ये सक्रिय असताना त्यांना दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील मिळाली. मात्र, २००९ साली काही मतभेदांमुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थिरावले. पक्षात फूट पडली तरी त्यांनी शरद पवार गटाशी निष्ठा राखली. तथापि, गेल्या काही वर्षांत पक्षांतर्गत कुरघोडी तसेच वाढत्या दुफळीला कंटाळल्याने ते शरद पवार गटात फारसे सक्रीय दिसले नाहीत. विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्षाच्या बैठकांनाही अनुपस्थित राहणे पसंत केले आणि राजकीय पातळीवर त्यांची सक्रियता लक्षणीयरीत्या कमी झाली.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळीही माजी आमदार अरुण पाटील हे शरद पवार गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रत्यक्षात, त्यावेळच्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी कोणत्याही नव्या पक्षात न जाता पुन्हा एकदा भाजपकडेच वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या समर्थकांसह त्यांनी मंगळवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात औपचारिक प्रवेश केला. या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदू महाजन, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र, रावेरमधून दोन वेळा आमदार झाल्यावर पुन्हा जिंकण्याची खात्री असतानाही २००९ मध्ये तिकीट कापण्यात आल्यामुळेच आपण भाजपला रामराम केला होता, असे माजी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, दोन वेळा आमदारकीची संधी देणाऱ्या भाजपमध्ये पुन्हा घरवापसी केल्याचे समाधान असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्याची आणि देशाची सध्याची आर्थिक व इतर स्थिती लक्षात घेता ती हाताळण्याची क्षमता फक्त भाजपच्या प्रदेश आणि देश पातळीवरील नेत्यांमध्ये आहे. तेच राज्याचे आणि देशाचे भले करू शकतील, असा मला विश्वास आहे. म्हणून आपण भाजपमध्ये घरवापसी केली. त्या तुलनेत पक्ष संघटन तसेच प्रगती करण्याची शक्यता फारच कमी दिसत असल्याने आपण आधीचा पक्ष सोडल्याचे माजी आमदार पाटील बोलून दाखवले. त्याचप्रमाणे आपली कोणावरही नाराजी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.