विविध बँकांच्या ए.टी.एम. केंद्रात ग्राहकांच्या डेबीट, क्रेडिट कार्डची अफरातफर करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शहरातून ताब्यात घेण्यात आले.
मनमाड शहर परिसरात चार जून रोजी देना बँकेत संजय गांगुर्डे हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या संशयिताने पैसे काढून देतो, असे सांगत एच.डी.एफ.सी. बँकेचे डेबीट कार्ड आणि पीन कोड घेत पाच हजार रुपये काढून दिले. असे करताना हातचालाखीने एटीएम कार्ड बदलत त्याने त्यातून सात हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगाराची गुन्हा करण्याची पद्धत आणि विविध एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी करत संशयिताचा शोध लावला.
नाशिक शहरातील गणेशवाडी परिसरातून सराईत गुन्हेगार माधव ऊर्फ सोनू आहेर (२७, रा. निफाड) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने मनमाड येथील देना बँक एटीएम केंद्रात एकाची फसवणूक केल्याची कबुली दिली. पोलिसांनी माधवकडून अदलाबदल करून नेलेले एच.डी.एफ.सी. तसेच एस.बी.आय. बँकेची दोन ए.टी.एम. कार्ड, एक भ्रमणध्वनी असा मुद्देमाल जप्त केला. त्याने मनमाड आणि इगतपुरी येथेही अशा स्वरूपाचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. माधववर निफाड, पिंपळगाव, वणी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहरातील सातपूर, पंचवटी, उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सहा गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांचे आवाहन
जिल्ह्य़ातील बँक, ए.टी.एम.मधून पैसे काढताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एटीएम केंद्रात एकाच व्यक्तीने प्रवेश करावा. पैसे काढताना पाठीमागे अनोळखी व्यक्ती अथवा कोणीही असल्यास त्यास प्रतिबंध करावा. एटीएम कार्ड स्वाइप करताना त्या ठिकाणी इतर कोणते बनावट उपकरण लावलेले आहे काय, याची खात्री करावी. पैसे काढल्यानंतर क्लिअरचे बटन दाबून व्यवहार पूर्ण झाल्यावरच बाहेर पडावे. कोणी मदत करण्याचे सांगत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात नकार द्यावा. भ्रमण अथवा दूरध्वनीवर बँकेची कुठलीही माहिती देवू नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात, बँक शाखा आणि नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाणे (०२५३-२२००४०८) या क्रमांकावर संपर्क साधावा.