मालेगाव : शहराच्या सोयगाव भागात आयुर्वेदिक उपचाराचा देखावा करून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून या केंद्राच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बनावट डॉक्टरसह त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या अवैध गर्भपात केंद्रात गर्भलिंग निदान चाचणीनंतर स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार घडत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोयगाव येथील हनुमान मंदिराजवळील व्यापारी गाळ्यांमध्ये साई संजीवनी सेवाभावी क्लिनिक या नावाने आयुर्वेदिक उपचार करणारा दवाखाना थाटण्यात आला आहे.या दवाखान्यापासून काही अंतरावर एका बंगल्यात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत असे. तेथे आयुर्वेदिक उपचाराच्या नावाने अवैध पद्धतीने गर्भलिंग चाचणी व गर्भपात केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व महापालिका आरोग्य खात्याच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री अचानक धाड टाकली.
यावेळी या केंद्रात येवला तालुक्यातील एक महिला गर्भपात करण्यासाठी दाखल असल्याचे आढळून आले. तसेच या ठिकाणी गर्भपातासाठीचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर औषधसाठा आढळून आला. या केंद्राचा संचालक डॉ. संदीप सावंत हा केवळ बी.ए.एम.एस पदवीधारक असून गर्भपात करण्यासाठी कोणतीही पात्रता त्याच्याकडे नाही. तसेच त्याच्या अन्य साथीदारांकडेही वैद्यकीय उपचारांची शैक्षणिक पात्रता असल्याचे आढळून आले नाही. संबंधित रुग्ण महिलेला या पथकाने अधिक उपचारासाठी तातडीने सामान्य रुग्णालयात हलविले.
या प्रकरणी पथकाने डॉ संदीप सावंत, अश्विनी गायकवाड, मनीषा टाकळकर, किशोर जाधव व विनोद जाधव यांना ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगिता कोकाटे,उपनिरीक्षक दत्तात्रय कांभीरे तसेच आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर, डॉ अश्विनी पवार, डॉ.मोमीन अनुशिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. महापालिका आरोग्याधिकारी डॉ.जयश्री आहेर यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून गोरख धंदा सुरू
स्त्री-भ्रूण हत्येचा अमानुष प्रकार रोखण्यासाठी शासनाने गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी घातली आहे. त्यासाठी कडक कायदा करण्यात आला आहे. मात्र, तरीही जास्त पैशांच्या हव्यासापोटी लपून-छपून बेकायदा गर्भलिंग चाचण्या व गर्भपात होतच असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. छापा टाकलेल्या ठिकाणी आयुर्वेदिक उपचाराच्या नावाने केंद्र चालवले जात होते. या केंद्रात दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये रुग्णांसाठी पाच खाटा ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आयुर्वेदिक उपचारांसाठी रुग्ण येत असावेत,अशी समजूत झाल्याने आजूबाजूच्या लोकांना इतके दिवस येथे गर्भपात होत असल्याबद्दल संशय येऊ शकला नाही. मात्र पोलिसांना सुगावा लागल्यानंतर या केंद्राचा खरा चेहरा समोर आला. या ठिकाणी अवैध गर्भपात करण्यासाठी संबंधितांकडून बक्कळ रक्कम उकळली जात असल्याचा संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरख धंदा सुरू असावा,अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.