जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या ‘बॅलेट- कंट्रोल युनिट’,‘व्हीव्हीपॅट’ या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ करणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ येथे पूर्ण करण्यात आली.

या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.  निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस व्यवस्थेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची नोंद घेऊन ते मतदार संघनिहाय वितरित करण्यात येते.

ही प्रणाली अचूक, पारदर्शक तत्त्वावर निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा २० ते ३० टक्के अधिक प्रमाणात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत.

संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण करण्यात आल्याचे मांढरे यांनी सांगितले.

मतदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र. व्हीव्हीपॅट यंत्राबाबत सर्व शंकांचे निरसन करुन मतदान प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी जिल्ह्य़ातील सर्व नायब तहसीलदार आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

मतदारसंघनिहाय यंत्राचे वितरण

सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट यंत्र नेताना ते वाहतूक ‘मोड’मध्ये असणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. विधानसभा मतदारसंघनिहाय १५ मतदारसंघांत ४५७९ मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५०१ बॅलेट-कंट्रोल युनिट आणि ५९६१ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.