जळगाव – रक्षाबंधनाच्या आधी दोन हजार रुपयांवर गेलेले केळीचे दर आता १४०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दरात मोठी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि बऱ्हाणपुरच्या जिल्हा प्रशासनाच्या चर्चेतून मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार, शुक्रवारी भुसावळमध्ये दोन्ही प्रशासनाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज दर जाहीर करतात; मात्र, व्यापारी वर्ग मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या केळी दरालाच आधार मानतात. एवढेच नव्हे, तर देशभरातील व्यापारी सुद्धा बऱ्हाणपुरच्या दरावर लक्ष ठेवून व्यवहार करतात. त्यामुळे बऱ्हाणपुरमधील भावात किंचित चढ-उतार झाला तरी त्याचे थेट पडसाद संपूर्ण देशभर उमटतात.

याच परिस्थितीचा फायदा घेत बऱ्हाणपूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. दर कधी अचानक वाढविणे तर कधी विनाकारण घसरणे, अशा मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडेही तक्रार केली होती. शेतकऱ्यांनी केळीच्या दरांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरांवर नियंत्रण आणून योग्य दर फलक लावावा आणि त्याच दरात केळी खरेदी व्हावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी जाणीवपूर्वक फसवणूक करीत असून चुकारे देतानाही शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी मंत्री महाजन यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मंत्री महाजन यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली. तसेच बऱ्हाणपूर आणि जळगाव या दोन्ही ठिकाणच्या प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

त्या अनुषंगाने शुक्रवारी भुसावळमध्ये आयोजित दोन्ही ठिकाणच्या प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत केळी उत्पादक शेतकरी, कृषितज्ज्ञ तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच केळी दराच्या अस्थिरतेवर तोडगा काढण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. जाहीर दरांपेक्षा कमी भावात केळीची खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. खान्देशात केळीची थेट खरेदी किंवा शिवार खरेदी ही बऱ्हाणपूर बाजार समितीच्या लिलाव दरानुसार केली जात आहे. मात्र, सध्या बऱ्हाणपूरमध्ये केळीची किमान दरपातळी ६०० रुपयांपर्यंत घसरली असून, कमाल दरही केवळ १५०० रुपयांपर्यंत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्हाणपूर बाजार समितीच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.