जळगाव : खान्देशात उत्पादित होणाऱ्या केळीला उत्तर भारतातून गेल्या काही दिवसांपासून चांगली मागणी आहे. बाजारभाव सुद्धा बऱ्यापैकी टिकून आहेत. तशात रक्षाबंधनासह जन्माष्टमीमुळे केळी भावात अचानक तेजी निर्माण झाल्याने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खान्देशातील केळीला श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या काही राज्यातून चांगली मागणी राहिली आहे. याच काळात गुजरातमधील केळीही त्या बाजारपेठेत पोहोचली असली, तरीही खान्देशातील केळीने उच्च दर्जाच्या गुणवत्तेमुळे आपली बाजारातील पकड कायम ठेवली आहे. वाढत्या स्पर्धेतही केळीच्या दरात मोठी घसरण झाली नाही, हे विशेष. सर्वत्र नवती केळीची काढणी सध्या वेगाने सुरू असताना, बाजारातील केळींची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली. एकट्या बऱ्हाणपूर बाजार समितीत सद्यःस्थितीत ३०० ते ३५० गाडी आणि इतर भागातू १२५ ते १५० गाडी केळीची आवक दररोज होताना दिसत आहे.
असे असताना, रक्षाबंधन आणि जन्माष्टमीमुळे ग्राहकांकडून आणखी मागणी वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी केळीला जास्तीचे पैसे देण्याची तयारी आता दाखवली आहे. परिणामी, केळी भावात अवघ्या चार-पाच दिवसातच क्विंटलमागे सुमारे ३५० ते ४५० रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तीन ऑगस्टला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीला कमाल १५१५ रूपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव होता. गुरूवारी बऱ्हाणपुरात केळीला कमाल १९५१ रूपयांचा भाव मिळाला. नवती केळीच्या काढणीला वेग आल्यानंतर बाजारातील आवक वाढून भाव आणखी खाली येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र, रक्षाबंधन व जन्माष्टमीमुळे दर कमी होण्याची भीती कमी झाली. पुढे गणेशोत्सव असल्याने केळीचे दर बऱ्यापैकी टिकून राहण्याची आशा शेतकऱ्यांना वाटते आहे.
जळगाव जिल्ह्यात नवती केळीनंतर आता कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली आहे. दुसरीकडे गुजरातमधील नवती केळी अखेरच्या टप्प्यात आली आहे. अशा स्थितीत जळगावमधील चांगल्या दर्जाच्या केळीला बाजारात मागणी असून, भावातही सुधारणा झाली आहे. मुकेश पाटील (सचिव, वामनरावभाऊ पाटील सहकारी फळ विक्री संस्था, चोपडा)