जळगाव – देशांतर्गत मागणी, निर्यातीला चालना आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीमुळे सध्या सगळीकडे केळीचा तुटवडा असतानाही, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीचे भाव मुद्दाम कमी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्याविषयी ‘लोकसत्ता’ ने प्रकाशझोत टाकल्यानंतर संबंधित प्रशासनाला अखेर जाग आली असून, केळी भावात सुमारे ३७५ रुपयांची सुधारणा झाली आहे.
बऱ्हाणपूर बाजार समितीचे भाव संपूर्ण देशात प्रमाण मानले जात असताना, मनमानी पद्धतीने केव्हाही आणि कितीही केळीचे भाव वाढविण्याचे आणि कमी करण्याचे काम त्याठिकाणची यंत्रणा नेहमीच करत असते. केळी उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान त्यामुळे सोसावे लागते. बऱ्हाणपुरात १६ मे रोजी केळीचे भाव ३०३५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु, नंतरच्या दोन दिवसात सुमारे ५०० रुपयांनी भाव कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना एका गाडीमागे तब्बल ७५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.
आधीच शेतकरी तापमान वाढीसह वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे जेरीस आले आहेत. त्यात बऱ्हाणपुरात केळीचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले. याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सोमवारी बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांच्याशी संपर्क साधत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी तेथील बाजार समितीवर जातीने लक्ष ठेवण्यासाठी एक जबाबदार अधिकारी तातडीने नियुक्त करणार असल्याचे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी बऱ्हाणपुरातील केळीच्या भावात क्विंटलमागे २५० रुपये आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा १२५ रुपये, अशा प्रकारे जवळपास ३७५ रुपयांची वाढ दोनच दिवसात केळी भावामध्ये झाली. केळी उत्पादकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचाही पुढाकार
बऱ्हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केळी भावाची अस्थिरता लक्षात घेता, शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांची भेट घेऊन केळीच्या किमती आणि तेथील बाजार समितीच्या समस्यांबाबत चर्चा केली. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुढील काळात एकत्रित पाऊले उचलण्याचा निर्धार केला.