नाशिक : वाहनतळ तसेच स्मार्ट सिटी योजनेचे पाइप तसेच इतर साहित्य पडलेले असल्याने यंदा शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदानावर गणेश मंडळांना देखावे उभारता येतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे यासंदर्भात आवाज उठविण्यात आल्यावर स्मार्ट सिटी योजनेचे साहित्य हटविण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता मंडळांनी मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे.
गणेशोत्सवात शालिमार येथील भालेकर मैदानात एकाच ठिकाणी किमान दहा मंडळांच्या गणेशाची सजावट पाहण्यास मिळत असल्याने नाशिककर मैदानावर गर्दी करत असतात. परंतु, या वर्षी मैदानात पाईप, ढिगारा, वायर असे साहित्य मोठय़ा प्रमाणात पडलेले होते. त्यामुळे यंदा या मैदानावर गणेशोत्सव होईल की नाही, अशी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात गणेशोत्सव महामंडळातर्फे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले होते. महामंडळाने केलेल्या मागणीनुसार भालेकर मैदानावरील स्मार्ट सिटी योजनेचे साहित्य हटविण्यात आल्याने या ठिकाणी मंडळांनी मंडप उभारणीस सुरुवात केली आहे.

महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे निवेदनात इतरही अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही मागण्यांवर पालिकेच्या वतीने कामही सुरू करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे महावितरणच्या वायर काही ठिकाणी तुटल्या असून त्वरित नवीन केबल टाकणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसविण्यात आल्यास वाहतूक पोलीस आणि बंदोबस्तावरील पोलीस यांना मदत होईल, असेही महामंडळांने म्हटले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे प्राथमिकरीत्या पूर्ण करण्यात आल्यावरच दुसरी कामे सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे, गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग त्वरित दुरुस्त करावा, सदर मार्गावरील प्रलंबित असलेली डांबरीकरणाचे कामे, काँक्रीटीकरणाची कामे तसेच या मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, रस्त्याच्या दुतर्फा कडय़ांची कामे त्वरित करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.

याशिवाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पालिका, पोलीस आयुक्त यांची एकत्रित परवानगी एक खिडकी योजनेतून देण्यात यावी, या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष व अधिकारी नेमण्यात यावा, परवानगी अर्ज आभासी आणि प्रत्यक्ष या दोन्ही पद्धतीने स्वीकारण्यात यावा, अर्ज दिल्यानंतर चोवीस तासात परवानगी देण्यात यावी, मंडळांना मिळणाऱ्या जाहिरातीवर कोणताही कर आकारण्यात येऊ नये, रस्त्यावरील गणेश मंडळांजवळ जमा होणारा कचरा, ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, गणेश मिरवणूक मार्गावरील असलेल्या आडव्या वीज केबल भूमिगत करण्यात याव्यात, शहरातील बंद असलेले उच्च प्रखर दिव्यांची दुरुस्ती करून ते कायम सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, गणपती उत्सव काळात सायंकाळी सहानंतर शहरातील अशोक स्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी या भागांतून जाणाऱ्या सिटीलिंक शहर बससेवेचे मार्ग बदलण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी खड्डे बुजविण्यासह इतर मागण्यांवर प्रशासनाकडून काम सुरू करण्यात आले आहे.