पोलीस, पुरोहितांचा सर्व काही शांत असल्याचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी दर्शन घेण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पुन्हा एकदा पुरोहित, गुरव आणि भाविकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. मंदिर परिसरात जमावाने धुडगूस घालत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. परतताना जमावातून काहींनी त्यांच्या दिशेने चपलाही भिरकावल्या. या गोंधळात पोलिसांनी देसाई यांना कसेबसे मंदिरात नेऊन अवघ्या २० मिनिटात बाहेर काढत सिन्नरला रवाना केले. परंतु, देसाई यांनी पुन्हा तिथून माघारी येण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नाशिकरोडच्या सिन्नर फाटा पोलीस चौकी येथे रोखण्यात आले. मंदिर परिसरात गतवेळप्रमाणे गोंधळ उडाला असला तरी पोलीस, पुरोहित व गुरव मंडळींनी तसे काहीच घडले नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी बंदोबस्त देण्याचा देखावा करत गर्भगृहात जाण्यापासून रोखल्याचा आरोप देसाई यांनी केला.

पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा हक्क असल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या मुद्यावर लढणाऱ्या महिला संघटना ज्या ठिकाणी महिलांना प्रवेशास प्रतिबंध आहे, तिथे जाऊन प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने १९ मे रोजी भूमाता ब्रिगेडचा कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरोहित, गुरव व भाविकांनी उधळला होता. त्यावेळी देवस्थान कार्यालयाची तोडफोड केली गेली. या गोंधळाची गुरुवारी पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली. देसाई येणार म्हणून भल्या सकाळपासून गुरव, पुरोहित व भाविकांनी मंदिर परिसरात ठाण मांडले. आदल्या दिवशी रात्री पोलिसांनी देसाई यांना नोटीस बजावत सर्वसामान्यांना जिथून दर्शन घेता येते, तिथपर्यंत जाऊन दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच दोन दिवसांपूर्वी स्थानिक पुरोहित व गुरव मंडळींची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मंदिराच्या थेट गर्भगृहातील प्रवेशास पुरोहित व गुरव यांचा विरोध कायम राहिला.

या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला.

दुपारी सव्वा बाराच्या सुमारास देसाई यांचे महिला कार्यकर्त्यांसमवेत मंदिर परिसरात आगमन झाले. तोपर्यंत शांत असलेल्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली.

पोलिसांनी बंदोबस्तात त्यांना मंदिरात दर्शनासाठी नेले. गाभाऱ्यात आधीपासून मोठय़ा संख्येने पुरोहित व गुरव मंडळी बसलेली होती. देसाई या ठिकाणी आल्यावर गोंधळ अधिकच वाढला. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. मंदिराच्या मागील बाजूने देसाई यांना नेले जात असताना आसपासची घरे व गल्लीत थांबलेल्या काहींनी अचानक धाव घेऊन मारहाणीचा प्रयत्न केला. देसाई यांच्या समवेत असलेल्या इतर महिलांची त्यातून सुटका झाली नाही. या गोंधळात पोलिसांनी संबंधितांना मोटारीत बसवून थेट सिन्नरच्या दिशेने मार्गस्थ केले.

सर्वसामान्यांना जिथून दर्शन घेता येते, तिथून देसाई यांनी दर्शन घेऊन या मंदिराच्या अनादी काळापासून चालत आलेल्या प्रथा-परंपरांचे पालन केल्याचे हेमंत गाडे (गुरव) यांनी सांगितले. अतिशय शांततेत त्यांचे दर्शन झाले. यावेळी कोणताही गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. मंदिराचे सभागृह आकाराने लहान आहे. गर्दीमुळे रेटारेटी वा तत्सम प्रकार घडू शकतो. मात्र, तसे काही झाले असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे गोदाप्रेमी नागरी समितीचे देवांग जानी यांनी सांगितले. देसाई यांच्या दर्शनाला विरोध करण्यासाठी सकाळपासून हजारो भाविक मंदिराकडे येत होते. परंतु मोठी गर्दी होऊन गोंधळाची स्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही भाविकांना विनंती करून माघारी पाठवल्याचे त्यांनी नमूद केले. मंदिर परिसरात कोणताही गोंधळ झाला नसल्याचे उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशाचे पोलीस यंत्रणेने पालन केले. देसाई दर्शनासाठी आल्या त्यावेळी इतर भाविकांचे नेहमीप्रमाणे दर्शन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांवर टीकास्त्र

कपालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचा देखावा केला. तथापि, गर्भगृहात जाऊ न देता त्यांनीच आम्हाला खेचून मंदिराबाहेर काढत थेट पोलीस वाहनात डांबले. मंदिर परिसरात मोठा जमाव होता. गोंधळात महिला कार्यकर्त्यांचे केस ओढण्यात आले. कपडे फाडण्यात आले. वाहनात डांबताना डोक्याला मार लागला. पोलिसांनी दरोडेखोर असल्याप्रमाणे आम्हाला वागणूक दिली. सिन्नरला प्राथमिक उपचार घेतल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात दर्शनासाठी मी नाशिककडे निघाले. त्यावेळी नाशिक-पुणे रस्त्यावर सिन्नर फाटा येथे अडवण्यात आले. गर्भगृहात प्रवेशासाठीचा लढा सुरू राहणार आहे.

– तृप्ती देसाई

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumata brigade chief trupti desai to storm kapleshwar temple in nashik today
First published on: 27-05-2016 at 03:07 IST