भाजप नगरसेवकाला हत्येच्या गुन्ह्य़ात अटक | Loksatta

भाजप नगरसेवकाला हत्येच्या गुन्ह्य़ात अटक

जालिंदरच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले

भाजप नगरसेवकाला हत्येच्या गुन्ह्य़ात अटक
भारतीय जनता पक्ष (प्रतिकात्मक छायाचित्र )

सराईत गुन्हेगार जालिंदर अंबादास उगलमुगले ऊर्फ ज्वाल्या याच्या हत्येप्रकरणी भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या शेट्टी याला भाजपने महापालिका निवडणुकीआधी पक्षात पावन करून घेतले. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या शेट्टीच्या अटकेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादावेळी जालिंदरने कॉलर धरल्याचा राग शेट्टीच्या मनात होता. त्याचा वचपा काढण्यासाठी कुंदन परदेशी, राकेश कोष्टी या गुन्हेगारांना हाताशी धरून जालिंदरची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी पाथरवट लेनमध्ये एका टोळक्याने तलवारीच्या साहाय्याने धुडगूस घातला होता. त्या प्रकरणात अटक केलेला संशयित अविनाश कौलकर, रोहित कडाळे यांच्याकडून २० महिन्यांपूर्वी झालेल्या जालिंदरच्या हत्येचे धागेदोरे  पोलिसांच्या हाती लागले. त्यात कुंदन परदेशी, राकेश कोष्टी व श्याम महाजन यांची नावे पुढे आली. या संशयितांनी नगरसेवक हेमंत शेट्टीच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर शेट्टीसह सहा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी जालिंदरला दारू पाजून इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे नेले. त्याला बेदम मारहाण करून पेट्रोल ओतून जिवंत पेटवण्यात आले. आरोपींनी पुरावेही नष्ट केल्याचे तपासात समोर आले आहे. शेट्टी याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. शेट्टीसह कुंदन परदेशी आणि राकेश कोष्टीला न्यायालयाने १ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारा हेमंत शेट्टी भुजबळांचा कट्टर समर्थक म्हणून वावरत होता. महापालिका निवडणूक जवळ येताच भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्याशी असलेल्या सलगीमुळे त्याला उमेदवारीही मिळाली. पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पवन पवारला भाजपने असेच पावन करून घेतले होते. परंतु त्यावरून बरीच टीका झाल्यामुळे पक्षाने त्याला तिकीट दिले नाही.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2017 at 00:58 IST
Next Story
नांदूर-मानूर भागात गोदाकाठी तासभर थांबून दाखवावे