नाशिक – मान्सून पूर्वतयारीत महावितरण आणि महापालिकेने झाडांची छाटणी करताना पालपाचोळा गटारीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, मनपाने गटारी व पावसाळी गटारींची स्वच्छता करावी. जेणेकरून पावसाचे पाणी लवकर वाहून जाण्यास मदत होईल, अशी सूचना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

शहरातील जलमय, खड्डेमय स्थितीला प्रशासकासह सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी आमदार फरांदे यांनी तातडीने मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी विविध विभागांची बैठक घेतली. किरकोळ पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो. अशा स्थितीत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांचे फोन उचलत नाहीत.

महावितरणच्या कार्यशैलीवर फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील काळात अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मान्सून पूर्वतयारीची कामे करताना वीज कंपनी आणि महापालिकेने झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. ही कामे करताना पालपाचोळा गटारीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, महापालिकेने गटारी व पावसाळी गटारींची स्वच्छता करावी. जेणेकरून पावसाचे पाणी लवकर वाहून जाण्यास मदत होईल, असे त्यांनी सूचित केले. अनेक ठिकाणी स्थानिकांनी गतिरोधकाची मागणी केली असून ही कामे लवकर करावीत, असेही त्यांनी नमूद केले.