जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या खास विश्वासातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण काही ना काही कारणावरून नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी अवजड वाहने चालवण्याचा अनुभव असताना अधुनमधून ते ड्रायव्हिंगची हौस सुद्धा भागवितात. मागे एकदा त्यांनी कन्नड घाटात स्वतः ट्रक चालवला होता. त्यानंतर आता चाळीसगावात थेट एसटीच्या बसचे सारथ्य करून त्यांनी सर्वांना आश्चर्यचकीत केले.

जळगाव जिल्ह्यात सध्या मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्यासह अमोल जावळे, सुरेश भोळे आणि मंगेश चव्हाण हे पाच भाजप आमदार आहेत. प्रत्यक्षात, मंत्री महाजन आणि आमदार चव्हाण वगळता इतर कोणीच इतके कधी चर्चेत असल्याचे दिसून येत नाही. त्यातल्या त्यात आमदार चव्हाण हे बऱ्याचवेळा मंत्री महाजन यांच्याही एक पाऊल पुढे असतात. मंत्री महाजन त्यांच्या जामनेर मतदारसंघात बऱ्याचवेळा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ट्रॅक्टरचे सारथ्य करताना दिसून आले आहेत. मात्र, आमदार चव्हाण ट्रक चालविण्यासही मागे पुढे पाहत नाही. थेट ट्रकचे स्टेअरिंग हातात धरणाऱ्या आमदाराचे धाडस पाहुन नागरिकांनाही कौतूक वाटते. ड्रायव्हिंगचे कसब पणाला लावून आमदार चव्हाण मागे एकदा चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात सुरू असणाऱ्या पोलिसांच्या बेकायदेशीर वसुलीचा पर्दाफाश करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर देखील बनले होते.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव आगारात शनिवारी पाच नवीन बस गाड्या दाखल झाल्या. त्यांचे लोकार्पण करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करताना आमदारांनी फीत कापण्यासह नारळ वाढविणे किंवा फार तर नवीन बसमधून प्रवास करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, आमदारांनी उत्साहाच्या भरात थेट नवीन बसचे स्टेअरिंगच हातात घेतल्याने एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. त्यांना अवजड वाहने चालविण्याचा यापूर्वी अनुभव असला, तरी एखादी प्रवासी बस त्यांनी कधी चालवली नव्हती. अर्थात, या निमित्ताने प्रवाशांनाही आमदार चव्हाण यांच्या अतिउत्साही स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली.

चाळीसगाव आगारात यापूर्वी पाच नवीन बीएस-सहा प्रकारातील एसटीच्या बसेस दाखल झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच नव्या कोऱ्या बीएस-सहा बसचे लोकार्पण रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमदार चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः नवीन बस चालवून ड्रायव्हिंगचा करण्याचा आनंद घेतला. आता चाळीसगाव आगाराकडे एकूण १० नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. त्याच बरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच अत्याधुनिक ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. तसेच चाळीसगाव बस स्थानकाचे संपूर्ण रूप पालटून एअरपोर्ट दर्जाचे भव्य व प्रशस्त बसस्थानक बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. येत्या काही वर्षात सर्व कामे मार्गी लागून हजारो प्रवाशांची सोय होणार असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले.