नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी रवाना झाल्यामुळे राज्यात वातावरण तापायला सुरूवात झाल्याचा आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नोंदविला आहे. भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सेना-भाजपमधील संघर्ष उफाळून आला. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सेना कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहूल ढिकले या आमदारांसह शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नंतर भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिवसैनिक लाठ्या, काठ्या, दगडांनी दहशत पसरवत असताना भाजप कार्यकर्त्यांनी संयम दाखविल्याचा दावा केला. भाजप कार्यालयावर सकाळी दहा वाजता बाळा दराडे, दीपक दातीर आणि इतर शिवसैनिकांनी हल्ला केला. दगडफेक केली. आमच्या कार्यालयात कर्मचारी काम करीत होते. दगडफेक झाल्यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकला असता, याकडे लक्ष वेधण्यात आले. आपण गुन्हा नोंदवून घेतला आणि राणेंना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी रवाना झाल्यामुळे राज्यात वातावरण तापायला सुरूवात झाल्याचे सांगण्यात आले.

पोलीस यंत्रणा महाविकास आघाडीच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला. महाराष्ट्रभर गुंडगिरीचे दर्शन घडत आहे. सरकार गुंडांना पाठीशी घालत आहे. सत्तेचा वापर करून दबावतंत्र सुरू असल्याची टीका त्यांनी केली. भाजप शहराध्यक्ष पालवे यांनी योग्य वेळ आल्यावर दहशत पसरविणाऱ्या प्रवृत्तींना योग्य मार्गाने धडा शिकविला जाईल, असा इशारा दिला.

भाजपचे कार्यकर्ते कायदा

हातात घेऊन शांततेला गालबोट लागू देणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विजय साने यांनी शिवसैनिक आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप केला. त्यांच्या दहशतीला जनता कदापि बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले.