उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची अधिक उत्सुकता
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रामुख्याने याविषयी स्पर्धा निर्माण झाली आहे. भाजपने अलीकडेच प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन वातावरण निर्मितीस सुरुवात केल्यानंतर शिवसेनेने उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबीर आयोजनासाठी नाशिकचीच निवड केली. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या या शिबिरात शेतकऱ्यांपासून संघटनास्तरीय अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असले तरी भाजपसंदर्भात नेत्यांकडून होणाऱ्या मतप्रदर्शनाचीच शिवसैनिकांमध्ये सध्या तरी चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचा समारोप होणार असून अलीकडील बहुतांश कार्यक्रमांमध्ये ठाकरे हे भाजपवर तुटून पडत असल्याने या शिबिरातही ते भाजपवर शरसंधान साधण्याची संधी सोडणार नाहीत.
गंगापूर रस्त्याजवळील चोपडा बँक्वेट हॉल येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. प्रारंभी एकनाथ शिंदे आणि दादा भुसे या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा होईल. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील सुमारे तीन हजार पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबिरास उपस्थित राहणार असून त्यात सरपंचांपासून खासदारांपर्यंत लोकप्रतिनिधी तर उपविभागप्रमुखापासून जिल्हाप्रमुखांपर्यंत पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. शिबिरात शेतकऱ्यांच्या व्यथा व उपाय याविषयी उपनेते आ. गुलाबराव पाटील, शिवराय ते बाळासाहेब ठाकरे या विषयावर बानगुडे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय पत्रकार सकृत खांडेकर, पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे यांचेही व्याख्यान होणार आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच मुख्य लढत होण्याची चिन्हे असल्याने दोन्ही पक्षांमध्ये बळ वाढविणे सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांमधील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. इतर पक्षांमधून बाहेर पडणारे नगरसेवक शिवसेनेला प्राधान्य देत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी पक्षात येणाऱ्या आयारामांमुळे निष्ठावंत दुखावले जात असल्याने त्यांना सांभाळण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आपल्या भागात उमेदवारीसाठी तयारी करणाऱ्या निष्ठावंतांमध्ये एखाद्या आयाराममुळे संधी हुकण्याची भीती निर्माण होत असून त्यामुळे त्यांच्याकडून आयारामांना पक्षात स्थान देऊ नये किंवा त्यांचा उमेदवारीसाठी विचार करू नये, असा आग्रह आहे. त्यातच पक्षात प्रवेश करणाऱ्या वेगवेगळ्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेतच कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा असून पक्षप्रमुख त्याची कोणत्या प्रकारे दखल घेतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थानिक पातळीवर गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेने जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले. पाणीप्रश्नी भाजप नेत्यांची जितकी कोंडी करणे शक्य आहे, तितकी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यातच शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेने कळस गाठला असतानाही भाजपचे तिघे आमदार त्याविषयी चकार शब्द काढत नसल्याचा मुद्दाही शिवसेनेकडून या शिबिरात चर्चिला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत इतर पक्षांमधून प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक असले तरी शिबिरात तसा कोणताही प्रवेश सोहळा होणार नसल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केले. शिबिराच्या पाश्र्वभूमीवर तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बठकीस जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, ग्रामीण संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदींसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बठकीत शिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या तसेच नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बठकीचे सूत्रसंचालन अजय बोरस्ते यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2016 रोजी प्रकाशित
शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिरातही भाजप लक्ष्य ?
आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी नाशिकला लक्ष्य करण्यास सुरुवात केली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-04-2016 at 03:12 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp target in shiv sena regional camp