नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने एक मोफत दर्शन रांग आणि एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. या व्यवस्थेचा काही समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्यात येत असून मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणारी टोळी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नेस्तनाबूत केली आहे. या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी मंदिर दर्शनासह वेगवेगळी पूजा करण्यासाठी भाविकांची कायमच गर्दी असते. सर्वांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून देवस्थानच्या वतीने एक मोफत दर्शन रांग आणि एक देणगी दर्शन रांग अशी व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी दर्शनासाठी प्रत्येकी २०० रुपये घेतले जातात. त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास कक्ष तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे. काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या. विशेषत: बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची, भाविकांची या माध्यमातून काही टोळ्यांकडून फसवणूक होते. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याच्या सूचना त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिल्या.

गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ते बनावट नाव पत्ता आणि ओळखपत्र तयार करुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती ७०० रुपये ते एक हजार रुपये दराने विकत. संशयितांची झाडाझडती घेतली असता भ्रमणध्वनी आणि मेल आयडीच्या माध्यमातून हा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. संशयितांविरुध्द त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी केलेल्या कारवाईत दिलीप झोले आणि सुदाम बदादे (दोघे रा. पेगलवाडी), समाधान चोथे (रा. रोकडवाडी), शिवराज आहेर (रा. निरंजनी आखाड्याजवळ, त्र्यंबकेश्वर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ऑनलाईन पास काढण्यासाठी तयार करण्यात आलेली व्यवस्था ही सदोष असल्याचे उघड झाले. त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याबाबत मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन योग्य सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ऑनलाईन देणगी दर्शन व्यवस्थेत कमतरता आहे.. ऑनलाईन देणगी दर्शन संकेतस्थळावर कुठलाही भ्रमणध्वनी क्रमांक टाकला की ऑनलाईन पास मिळत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. स्थानिकांचे आधारकार्डही देवस्थानच्या वतीने तपासले जात नाहीत. देवस्थानच्या वतीने दिलेल्या या सुविधांचा गैरवापर होत असतांना विश्वस्त, कर्मचारी यांची या सगळ्यात काय भूमिका, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.