जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्याच्या मोबदल्यात शहरातील कौटुंबिक न्यायालयातील सहायक अधीक्षकास अवघ्या दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तक्रारदारांचा कौटुंबिक वाद शहरातील बी. जे. व्यापारी संकुलातील कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. तक्रारदाराने त्याची पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार कौटुंबिक न्यायालयातील सहायक अधीक्षक हेमंत बडगुजरने दोनशे रुपयांची मागणी केली होती.
हेही वाचा >>> बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू
त्याअनुषंगाने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने सापळा रचण्यात आला. त्यानुसार पथकाने बी. जे. व्यापारी संकुल परिसरात गोविंदा कॅन्टीनमध्ये सहायक अधीक्षक बुडगुजर यास दोनशे रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच रंगेहात पकडले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे.