चारुशीला कुलकर्णी
नाशिक: पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळीच पत्नीचे सौभाग्याचे लेणं असलेले तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळय़ातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडय़ा फोडणे, पायातील जोडवे काढणे या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विधवा सन्मान कायदा करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे.
महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या प्रथा, परंपरा म्हणजे महिलेवरील अत्याचारच असल्याकडे लक्ष वेधत राजु शिरसाठ, प्रमोद झिंजाडे, कालिंदी पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार या समविचारी व्यक्तींनी हे अभियान हाती घेतले आहे. पतीच्या निधनानंतर वैधव्य प्राप्त झाल्यावर समाजातील काही अपप्रवृत्तींना तोंड द्यावे लागू नये, यासाठी संबंधित महिलेने विधवेसारखं रहावे यासाठी काही घटक प्रयत्नशील असतात.
पतीचे निधन झाले की तिच्याविषयी समाजाचे विचार बदलतात. लग्न होण्यापूर्वी महिला या ना त्या स्वरुपात मंगळसूत्रवगळता अन्य दागिने वापरत असतात. मग पतीच्या निधनानंतर हे दागिने काढण्याचा अधिकार कोणी दिला, त्यांच्या भावनांना हात लावण्याची हिंमत होतेच कशी, यासह अन्य प्रश्न या अभियानातून विचारले जात आहेत. या अनिष्ट प्रथेचे समर्थन करतांना बऱ्याचदा महिलेवर कोणाची वाईट नजर पडू नये यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचा बचाव केला जातो. तिला कुठल्याही शुभ कार्यात केवळ ती विधवा म्हणून सहभागी करून घेतले जात नाही. अशा कृतीतून महिलेचा आत्मसन्मान दुखावला जातो. या अनिष्ट प्रथेविरोधात अभियानाने आवाज उठवला आहे.
पती निधनानंतर महिलेसमोर आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान असतांना तिला नामोहरम करण्याची संधी अनेकांकडून साधली जाते. अशा स्थितीत तिचा आत्मसन्मान दुखावला जाऊ नये , असे कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्या अंतर्गत १६ एप्रिल रोजी नाशिक येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अनिष्ट प्रथांमुळे विधवांना उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. आता तिला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाद करणे अन्यायकारक असल्याचा मुद्दा मांडला जात आहे. अभियानांतर्गत सामाजिक संस्था, महिला संघटना, बचत गट, महिला मंडळे, सरपंच गट यांच्या माध्यमातून अनिष्ट प्रथेविरोधात जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना महिला दिनी विधवा महिला सन्मान कायदा व्हावा म्हणून निवेदने देण्यात आली. जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्यासमोर उपरोक्त मागणी मांडली जात आहे.
करोना काळात एका व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी पत्नीचा विरोध असतानाही इतर महिलांनी कुंकू पुसत तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. ही बाब खटकली. यातूनच या अभियानाची बीजे रोवली गेली. अनिष्ट प्रथा राबविणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यात अनिष्ट रूढी, परंपरांविषयी तरतुदी आहेत. परंतु, त्यात स्पष्टता नाही. त्यामुळे एकतर त्यात अशा प्रथांचा स्पष्ट उल्लेख करावा किंवा नवीन कायद्याद्वारे अनिष्ट प्रथांना चाप लावण्याची गरज आहे.
– राजु शिरसाठ (अभियान समन्वयक)