लोकसत्ता वार्ताहर

धुळे: वाढदिवसाच्या दिवशी वापरात येणारी चमकणारी मेणबत्ती तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भय्या भागवत (३६, जैताणे, साक्री) यांनी तक्रार दिली आहे. रोहिणी कुवर, जगन्नाथ कुवर आणि अरविंद जाधव (सर्व रा. वासखेडी, साक्री) तसेच सुरेश माने (धोत्री, तुळजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी जगन्नाथ कुवर हा कारखान्याचा परीक्षक असून अरविंद जाधव हा कंपनीचा ऑपरेटर आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेला वासखेडी येथील भवानी सेलिब्रेशन वर्कशॉप येथे अचानक लागलेल्या आगीत आशाबाई माळी, पूनम माळी, नैनाबाई माळी आणि सिंधुबाई राजपूत (सर्व रा.जैताणे, साक्री) यांचा भाजल्याने मृत्यू झाला. संगीता चव्हाण आणि निकिता महाजन या दोन्ही गंभीर आहेत.

आणखी वाचा-विहीर खोदकामावेळी स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारखाना चालविणाऱ्या चौघा संशयितांनी मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना न करता स्फोटक दारू वापरून वाढदिवसासाठी वापरली जाणारे चमकणारी मेणबत्ती तयार करण्याचा उद्योग सुरु केला होता. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडे शासनाचा परवानाही नसल्याचे आढळून आले. चौघांनीही या कारखान्यात बालमजुरांना कामावर ठेवले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.