scorecardresearch

नाशिक : उपोषणकर्ते मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कुठलीही पूर्वपरवानगी न घेता केलेल्या उपोषणप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case against MNS party workers nashik
उपोषणकर्ते मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे (संग्रहित छायाचित्र)

नाशिक – ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीरपणे कामावरून काढल्याने उपासमारीचे संकट ओढावलेल्या सफाई कामगारांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी कुटुंबियांसह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने संबंधितांना कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. दुसरीकडे कुठलीही पूर्वपरवानगी न घेता केलेल्या उपोषणप्रकरणी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, पालकमंत्री, मनपा आणि पोलीस प्रशासन आदी स्तरावर दाद मागूनही न्याय मिळाला नसल्याने मनसेने सोमवारपासून मनपाच्या प्रवेशद्वाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यात मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे आदींच्या नेतृत्वाखाली सफाई कामगार व कुटुंबियही सहभागी झाले होते. वॉटरग्रेस कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याचा राग धरून ठेकेदाराच्या सहकाऱ्यांनी तीन कामगारांना पखाल रस्त्यावरील कार्यालयात बोलावून जबर मारहाण केल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे होते. संबंधित कंपनीने बेकायदेशीरपणे ४५० ते ५०० सफाई कामगारांना कामावरून हटवले. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाला मनपा आयुक्तांनी या कामगारांना दोन दिवसांत परत कामावर घेण्याचे आश्वासन दिले. मनसेच्या लढ्यास यश आल्याची भावना दातीर यांनी व्यक्त केली. त्यानंतर दोन दिवस चाललेले उपोषण मनसे पदाधिकारी व सफाई कामगारांनी मागे घेतले.

दरम्यान, हे आंदोलन करताना मनसेने कुठलीही परवानगी घेतली नव्हती. शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश लागू आहे. आंदोलनासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. असे असताना कुठलीही परवानगी न घेता मनसेचे पदाधिकारी मनपा मुख्यालयासमोर एकत्र जमले. घोषणाबाजी करीत उपोषण केल्याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, तुषार मंडलिक, परशुराम साळवे, ज्ञानेश्वर बगाडे, सुजाता डेरे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 20:44 IST