सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झाले तर खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होईल. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. सहकार व खासगी क्षेत्र एकाच वेळी एकाच क्षमतेने सुरू राहिल्यास निकोप स्पर्धा होऊन गुणवत्ता वाढेल. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. सहकारी साखर कारखाना सुरू ठेवणे काळाची गरज असून सहकाराच्या संस्कारित भावनेने कारखाना चालवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने तीन वर्षांपासून बंद पडलेल्या वसाकाची चक्रे पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू झाली आहेत. थकीत कर्जामुळे राज्य बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला होता. बिकट अवस्थेतील कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन आणि राज्य बँक यांच्यात दुवा साधण्याचे काम आ. डॉ. आहेर यांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. संचालक मंडळ, कर्मचारी व शेतकरी हे साखर कारखान्याचे महत्त्वाचे घटक आहेत. संचालक मंडळाने सहकाराच्या भावनेने आणि शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालविणे गरजेचे असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांनीही कारखान्यामुळे आपले अस्तित्व आहे याची जाणीव ठेवावी. साखर कारखान्यामुळे उसाला चांगला भाव मिळतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. या तीन घटकांनी एकत्रितपणे कार्य केल्यास वसाका देशासमोर आदर्श प्रस्तुत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गतवर्षी सहकार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने साखर कारखान्यांना दोन हजार कोटीची मदत दिली. यावर्षी साखरेला चांगला भाव आहे. त्यामुळे कारखान्यांनी सकारात्मकतेने काम केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. कसमादे पट्टय़ातील प्रलंबित जलसिंचन योजनांना मान्यता देऊन निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.पालकमंत्री महाजन यांनी चांगले उत्पादन पाण्याशिवाय शक्य नाही. मात्र, पावसाचे प्रमाण मर्यादित असल्याने पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याच्या बचतीसोबत पिकांची गुणवत्ताही वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना इस्रायलचे उदाहरण देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. सहकार राज्यमंत्री भुसे यांनी सहकार क्षेत्रातून भ्रष्टाचार दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. अडीच लाख सहकारी संस्थांपैकी उद्दिष्टाप्रमाणे काम करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या संस्था कमी आहे. त्यामुळे केवळ नावापुरत्या सुरू असलेल्या व शेतकरी हिताची काळजी न घेणाऱ्या संस्था बंद करण्याची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2016 रोजी प्रकाशित
सहकार उद्ध्वस्त झाल्यास खासगी क्षेत्राची मक्तेदारी!
सहकार क्षेत्र उद्ध्वस्त झाले तर खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होईल
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-01-2016 at 09:40 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis at vasantdada sahakari sakhar karkhana