गुन्हा दाखल न केल्याबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विचारणा

नाशिक : भिवंडीतील वाहतूक विभागातील गैरव्यवहार उघड केल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपणास खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत साहाय्यक पोलीस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे. या संदर्भात तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग, उपायुक्त डॉ. स्वामी, साहाय्यक आयुक्त रमेश धुमाळ आदींविरुद्ध शहर पोलिसांसह राज्याच्या पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली.  महिनाभरापूर्वी तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह राष्ट्रवादीचे आमदार आता पुढे सरसावले आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी नाशिक पोलिसांना पत्र पाठवून निपुंगे यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा का दाखल झाला नाही, असा जाब विचारला आहे. परमबीर यांच्याविरोधात याआधी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत. ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना निपुंगे यांच्या कार्यालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. भिवंडीतील नारपौली वाहतूक विभागाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यामुळे दुखावलेल्या तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर यांनी खोट्या गुन्ह्यात आपणास अडकवल्याचे निपुंगे यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात झिरवाळ यांनी नाशिक पोलिसांकडे विचारणा केली आहे. निपुंगे हे आदिवासी अधिकारी आहेत. ते आपल्या दिंडोरी मतदार संघातील रहिवासी आहेत. त्यांनी १४ जून २०२१ रोजी आडगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दिली. परंतु त्याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. ही बाब अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चारचे उल्लंघन असून या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे झिरवाळ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या अन्य एका आमदाराने पत्राद्वारे अशीच मागणी केल्याचे सांगितले जाते.