नाशिक : महायुतीच्यावतीने वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कुठे कोणाची किती ताकद आहे यावर मंथन सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाला मिळणार, याबाबत महायुतीत अद्याप एकमत झाले नसल्याची कबुली राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आपणास शिरूरमधून रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याविषयी अनभिज्ञता दर्शवत त्यांनी पक्षाचा आदेश आल्यास ऐकावे लागते, असे सूचक विधान केले.
हेही वाचा… मालेगाव : अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
हेही वाचा… ‘समृद्धी’मुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील कोंडी कशी कमी होईल ?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाने लोकसभेच्या १० जागांची मागणी केल्याचे नमूद केले. मागितलेल्या जागा पक्षाला मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ अद्याप मिटलेला नाही. शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यातील जागेवर भाजपने हक्क सांगितला आहे. नाशिकसह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात कोण इच्छुक, उत्तम उमेदवार कोणता, कोणत्या पक्षाची कुठे शक्ती जास्त आहे, यावर महायुतीकडून विचार केला जात आहे.लवकरच निर्णय जाहीर होईल, असे त्यांनी सूचित केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात आपणास उमेदवारी देण्याचा विषय प्रसारमाध्यमांमधून समजला. पक्षाने सांगितले तर उमेदवारी करावी लागते. बसा म्हटले तर, बसावे लागते. पक्षशिस्त सर्वांना पाळावी लागते असे त्यांनी मिस्किलपणे नमूद केले. राज्यात महाविकास आघाडीचे आव्हान नाही. त्यांचा दारुण पराभव होणार आहे. महायुतीचे उमेदवार ४० ते ४५ जागांवर निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.