नाशिक : जेव्हा निवडणूक आयोग ईव्हीएमवर निवडणुका घेत आहे, तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात विदा का देऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने ४५ दिवसांत सर्व विदा मिटवण्याचे आदेश का दिले, असे प्रश्न करीत या सर्वांमुळे निवडणूक आयोगाविरुद्ध संशय वाढला आहे. मतदार याद्यांचा इलेक्ट्रॉनिक विदा, सीसी टीव्ही चित्रण आणि अन्य मागण्यांवर निवडणूक आयोग खोडसाळपणा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोन व्यक्ती भेटण्यासाठी आले होते, त्यांनी १६० जागा जिंकून देण्याची शाश्वती दिली होती, याकडे लक्ष वेधले. यावर संगमनेर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले. भारतीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि सचोटीवर शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. शरद पवार यांना भेटलेले दोघे जण ईव्हीएम हॅक होऊ शकतात, असे संकेत देत होते असे आपल्याला वाटते, लोकशाहीत मतदान सर्वात महत्वाचे असते. त्यावर लोकशाही चालते. मतदानावर शंका उपस्थित झाल्यानंतर त्यांचे निरसन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्याबद्दल तसेच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय अशा लोकांच्या मनात शंका असल्याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निकालाने आपल्यासह अनेक लोकांना धक्का बसलेला आहे. आपण शुल्क भरून मतांची पूर्नतपासणी करण्याची मागणी केली. तेव्हा निवडणूक आयोगाने केवळ यंत्रांची पूर्नतपासणी होईल, मतांची नाही, अशी भूमिका घेतली. याचा अर्थ निवडणूक आयोग काहीतरी लपवत आहे, असा आरोप थोरात यांनी केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदवले गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. आदल्या दिवशीपर्यंत ओळखपत्रांचे वाटप केले जात होते. परंतु, त्याचे उत्तर कुणी देत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखविलेली कागदपत्रे केवळ एका मतदारसंघाचे आहेत. ही निवडणूक चोरलेली आहे हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. राहुल गांधी यांनी जे मांडले, त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही, असा आक्षेप थोरात यांनी नोंदविला.

शिरूर मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या मतदारसंघाचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की, काही गावांमध्ये असे अनेक लोक होते, जे त्या गावांचे रहिवासी नसतानाही मतदान करत होते. ते कोण आहेत, ते त्या गावांमध्ये का होते, शिर्डी मतदार संघात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले, असे प्रश्न करीत निवडणुकीआधीही यावर आक्षेप घेण्यात आले होते, परंतु ते सर्व व्यर्थ गेले, असा दावा थोरात यांनी केला.