विधानसभा निवडणुकीत सर्वशक्तीने उतरण्यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी केली असून या अनुषंगाने विभागनिहाय बैठका सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजता येथील तुपसाखरे लॉन्स परिसरात उत्तर महाराष्ट्राची विधानसभा आढावा बैठक होणार असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थितांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बैठकीस थोरात यांच्यासह कार्याध्यक्ष नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम या आमदारांसह माजी मंत्री यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव येथील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले असून त्यांच्याशी विधानसभानिहाय चर्चा करण्यात येईल. तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव वाम्सी रेड्डी यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या उपस्थितीत पहिलीच आढावा बैठक होत असल्याने त्या अनुषंगाने नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे आहेर यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश काँग्रेस समन्वयक जितेंद्र देहाडे यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित विभागनिहाय बैठका होत असून या बैठकीतून जिल्हानिहाय पक्षाचे बलाबल, उमेदवार याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सांगितले. राज्यस्तरावर २९ ते ३१ जुलै या कालावधीत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या जिल्हानिहाय मुलाखती होणार आहेत.

यासाठी राज्यभरातून ९५० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. समविचारी पक्षांसोबत याबाबत चर्चा सुरू असून पक्ष ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महापालिका गटनेते शाहू खैरे उपस्थित होते.