नाशिक – मतचोरीच्या मुद्यावरून काँग्रेस आक्रमक होत असून निवडणूक आयोग व यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कांदा प्रश्नी काँग्रेसतर्फे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाफेड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बनावट मतदार ओळखपत्र सापडल्याच्या प्रश्नावर त्यांनी मतदार यादीशी संबंधित गंमतीदार दाखले देत तुम्ही ते पाहिले नाही का, असा प्रश्न केला.

काँग्रेसतर्फे भर पावसात काढण्यात आलेल्या मोर्चात खा. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष शिरिषकुमार कोतवाल , शरद आहेर, शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी नेते कांद्याच्या माळा गळ्यात घालून सहभागी झाले होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नाफेडच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन बाजार समितीत लिलाव पद्धतीने कांदा खरेदीची मागणी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बनावट मतदार ओळखपत्र सापडल्याच्या प्रश्नावर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे लक्ष वेधले.

मतदानाच्या दिवसापर्यंत निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र वाटप झाले होते. एका घरात ८० मतदार आढळले. तर एकाच्या नावावर ५० मुलं आढळली, असा गौप्यस्फोट थोरात यांनी केला. मतदार यादीतील घोळाचे दाखले देत त्यांनी हे मतदार कोणी समाविष्ट केले, त्यांचे मतदान कोणी मिळवून घेतले, हा प्रश्न असल्याचे नमूद केले. निवडणूक काळात अशा अनेक तक्रारी झाल्या होत्या. पण त्याची साधी चौकशी झाली नाही. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप सत्ता मिळवण्यासाठी असे विविध फंडे अजमावत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

यावेळी त्यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची महायुती सरकारमध्ये अवहेलना होत असल्याचे नमूद केले. महाविकास आघाडीत भुजबळांना निमंत्रित केले जाईल का, या प्रश्नावर थोरात यांनी आम्ही लोकशाही, राज्य घटना वाचविण्यासाठी, न्याय हक्कासाठी लढत असल्याचे सांगितले. जे बरोबर आहेत, त्यांच्या सोबतीने ही लढाई सुरू राहील. सत्तेसाठी आम्ही लढत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्यातील अनेक जण अपेक्षेने तिकडे गेले. कोणी सत्तेसाठी तर कोणी चौकशी दाबण्यासाठी गेले. त्यांना पाचव्या रांगेत बसावे लागते. मग भ्रमणध्वनी खेळावा लागतो, अशी टिपण्णी त्यांनी केली.

माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. खरेतर भुजबळ हे मंत्री झाल्यानंतर त्यांना त्वरित सरकारी बंगला मिळायला हवा होता. बंगला मुंडे यांच्या ताब्यात असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. महायुतीतील वाद आता खऱ्या अर्थाने बाहेर येत असून खुल्या मैदानात कुस्ती व्हायला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.