लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वेगवेगळ्या भागात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे, माती पसरली असून मनपाच शहर विद्रुपीकरणाचे काम करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने स्मार्ट सिटी आणि मनपाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शालिमार परिसरात आंदोलन करण्यात आले.

शहरात महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीकडून विविध कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी खोदकाम होत आहे. शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखाली शालिमार परिसरात कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी योजनेतील कामात कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याचे उघड झाल्याचे छाजेड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… पुरस्कारांमुळे कला निर्मिती करण्याचा आनंद – चित्रकार सुहास बहुलकर यांची भावना; सावाना पुरस्काराने सन्मान

खोदकामावेळी वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घेतली जात नाही. नागरिकांनी ठेकेदाराकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाले आहे. याचा जाब विचारत अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. याची माहिती मिळताच मनपा व पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली.

हेही वाचा… भाडे, सुरक्षा ठेव निर्धारण समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी घ्या…गाळेधारक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेसकडून शहराचे विद्रुपीकरण केले जात असल्याची तक्रार करण्यात आली. नागरिकांच्या कराच्या पैश्यांचा या प्रकारे अपव्यय केला जात आहे. ही बाब कदापि सहन केली जाणार नसल्याचा इशारा बागूल यांनी दिला. मनपा व स्मार्ट सिटी कंपनीला जाब विचारण्यासाठी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे शहराध्यक्ष छाजेड यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, अल्तमस शेख, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, संदीप शर्मा, गौरव सोनार यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.