नाशिक : केंद्र सरकारने घाईघाईने लागू केलेली अग्निपथ योजना देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अहितकारी असून नजीकच्या काळात देशाला यामुळे मोठय़ा धोक्यांना तोंड द्यावे लागू शकते. योजनेचा कार्यकाळ आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेता अग्निवीर तांत्रिक कामासाठी कोणत्याच उपयोगाचे नाहीत असा आक्षेप घेत ही योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

 नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तीनही संरक्षण दलांची कार्यक्षमता फक्त अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांवर अवलंबून आहे. हवाई दलात ५० टक्क्यांपेक्षा अधिक वायुसैनिक तांत्रिक विभागात काम करत आहेत. लढाऊ विमाने, रडार, क्षेपणास्त्रे, संदेश प्रणाली, संगणक यांना चालू स्थितीत ठेवणे, त्यांची देखभाल, दुरुस्ती आदी कामांत निष्काळजीपणा झाला तर ते कोणाच्या जिवावर बेतू शकते. कौशल्य मिळविण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ लागतो. अशा कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या वायुसैनिकांची गरज असल्याने अशांची भरती त्वरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अग्निवीरांच्या नेमणुकीने सेवेत असलेल्या इतर वायुसैनिकांचा कामाचा ताण हलका होणार नाही. उलट नवशिक्यांना सांभाळण्यात त्यांचा वेळ आणि शक्ती जाणार आहे. या पार्श्वभूमीवर योजना रद्द करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.