नाशिक : शहरातील मायको चौक आणि उंटवाडी येथील प्रस्तावित उड्डाण पुलांसह रस्ते कामासाठी होणाऱ्या ५८८ वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. उड्डाण पूल आणि झाडे तोडण्याचा विषय आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर शुक्रवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे प्राचीन वटवृक्षाची पाहणी करणार आहेत. याआधी त्यांनी वटवृक्षासह शक्य ती झाडे वाचविण्याची सूचना महापालिकेला केलेली आहे.  मायको चौक आणि उंटवाडी येथील प्रस्तावित उड्डाण पुलांचा विषय काही दिवसांपासून गाजत आहे. पुलाच्या प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात दाखल याचिका उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रूपांतरित करण्यास मान्यता दिली. वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी मोहीम राबवत सुमारे अडीच हजार हरकती नोंदविल्या आहेत.

या उड्डाण पुलास मनसेसह राष्ट्रवादीने आधीच विरोध केला आहे. वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्षप्रेमींनी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य शासन, वन विभागाचे वनसंरक्षक तसेच महापालिका, पालिका आयुक्त कैलास जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती आणि या समितीचे सर्व सदस्य, शहर अभियंता  यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.  शहरातील वृक्षतोडीबाबत यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नये याविषयी निर्देश देण्यात आले आहेत.

वृक्षतोडीची कार्यवाही देखील नमूद केली असताना महापालिका मनमानी पद्धतीने वृक्षतोड करीत असून हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी १२बारा वाजता ऑनलाइन पद्धतीने सुनावणी होणार आहे.

आदित्य ठाकरे आज पाहणी करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ़ड़ीचशे वर्षांच्या वटवृक्षासह ५८८ झाडे तोडण्यास विरोध करत पर्यावरणप्रेमींनी या संदर्भात राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून वटवृक्षासह शक्य तेवढी झाडे वाचविण्याची सूचना केली होती. गरज भासल्यास उड्डाण पुलाच्या आराखडय़ात बदल करण्याची सूचना केली गेली होती. शुक्रवारी ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. पुलाच्या कामामुळे शेकडो वृक्षांची तोड होणार आहे. त्यामुळे त्यांना या परिसराची पाहणी करण्याचा आग्रह धरला गेला. त्यानुसार शुक्रवारच्या दौऱ्यात उंटवाडीतील वटवृक्षासह परिसराची पाहणी करणार असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले.